तुमसरात अधिकाऱ्यांची पदे रिक्त, जिल्हास्तरावरून पुर्तता होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 02:03 PM2024-10-16T14:03:58+5:302024-10-16T14:06:34+5:30
Bhandara : १९ ऑक्टोबरपर्यंत नवीन मतदारांची नोंदणी
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे घोषणा केली. मात्र, तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघात वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यात खंडविकास अधिकारी हे प्रभारी असून, मोहाडी येथील तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तुमसर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे जरी तत्काळ रुजू झाले आहे. त्यामुळे भंडारा येथून काही अधिकारी निवडणुकीच्या कामाकरिता येणार आहेत.
आचारसंहिता लागू झाली. मंगळवारी सकाळपासून प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे दिसून आले. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी शहरातील राजकीय पक्षांचे व नेत्यांचे होर्डिंग काढण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत ११ ऑक्टोबरपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी दिली.
सकाळी ११ वाजता तुमसर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तुमसर शहरात लागलेले विविध राजकीय पक्षांचे बॅनर व होर्डिंग काढायला सुरुवात केली होती. नियमानुसार आचारसंहिता घोषित झाल्यानंतर चोवीस तासांत शासकीय कार्यालयातील होर्डिंग, ४८ तासांत सार्वजनिक स्थळी लावलेले होर्डिंग व ७२ तासांत खासगी इमारतीवरील लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढण्यात येतात.
बुधवारपासून सर्व होर्डिंग्स तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी निकाळजे यांनी दिली. या संदर्भात यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
वयोवृद्ध मतदारांकरिता घरूनच मतदानाची सोय करण्यात आली आहे, तसेच मतदान केंद्रावर सर्व सोईसुविधा उपलब्ध राहणार आहेत. तुमसर मतदारसंघात २,१४४ इतक्या मतदारांची वाढ झाली असून, त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. तुमसर तहसील कार्यालयात मंगळवारी उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार मोहन टिकले, नायब तहसीलदार जांभुळकर, पेंदाम व खोकले उपस्थित होते.
यंत्रणा अलर्ट मोडवर
राज्याच्या शेवटच्या टोकावरील तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू मानला जातो. विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानंतर, प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली.