शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:34 AM2021-03-19T04:34:07+5:302021-03-19T04:34:07+5:30
भंडारा : जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांचे कोविड लसीकरण करावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात ...
भंडारा : जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांचे कोविड लसीकरण करावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी यांना भाजप शिक्षक आघाडीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
विद्यार्थी व पालक यांच्यामधला दुवा म्हणजे शिक्षक. शिक्षक हा सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतो. संपूर्ण जिल्ह्यामध्ये शाळा सुरू झाल्या असून शिक्षण देण्याचे काम नियोजितपणे सुरू आहे. यामध्ये ग्रामीण भागातूनसुद्धा मुले शहरातील शाळेत येतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिक्षकांना प्राधान्यक्रमाने लसीकरण करणे गरजेचे झाले आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून तर आजपर्यंत विविध प्रकारच्या नियोजनांमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची होती. सध्या सर्वेक्षणाची कामे अजूनही शिक्षकांकडे आहेत. शिक्षक स्वत:च्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता शासनाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करीत आहेत. असे असले तरी शासन स्तरावर शिक्षकांच्या लसीकरणासंदर्भात कुठलाच आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोविड १९ च्या कामाच्या वेळी राज्य शासनाला शिक्षकांची आठवण झाली; पण लसीकरणासाठी शासनाला आठवण आली नाही, असाही मुद्दा आघाडीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये नाराजी दिसून येत आहे. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांच्या लसीकरणाबाबत तत्काळ उपाययोजना व नियोजन करावे, अशी मागणीही भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना राज्य सहसंयोजक भाजप शिक्षक आघाडीचे डॉ. उल्हास फडके, जिल्हा संयोजक कैलास कुरंजेकर, राज्य कार्यकारिणी सदस्य मेघश्याम झंझाळ, सहसंयोजक माधव रामेकर, ज्ञानेश्वर बोडखे, साटोणे, घनश्याम तरोणे, शशांक चोपकर, बारई, प्रसन्न नागदेवे आदी उपस्थित होते.