तीन दिवसांत ३३ हजार ६६८ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:30+5:302021-06-25T04:25:30+5:30
लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या गावांसाठी सोमवार व मंगळवारी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद ...
लसीकरणात कमी प्रतिसाद असलेल्या गावांसाठी सोमवार व मंगळवारी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवसांच्या मोहिमेत १६ हजार ५५३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे सर्व यंत्रणांनी यासाठी जिल्हाभर जनजागृती अभियान राबविले होते. याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आढावा बैठकीत दिली होती. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जिल्ह्यात विशेष लसीकरण अभियान राबविले.
२१ जून रोजी ८३१८ नागरिकांनी लस घेतली. यात ७६१६ नागरिकांनी पहिला, तर ७०२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. २२ जून रोजी १८ ते ४४ वयोगटातील २६४९, तर ४५ वर्षांवरील ५५८६ अशा एकूण ८२३५ नागरिकांनी लस घेतली. यात ७५१२ नागरिकांनी पहिला डोस, तर ६६३ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला.
२३ जून रोजी जिल्ह्यात १७ हजार ११५ नागरिकांनी लस घेतली. यात १८ ते ४४ वयोगटातील १६ हजार २६८ व ४५ वर्षांवरील ८४७ नागरिकांचा समावेश आहे. १६ हजार ५५८ व्यक्तींनी पहिला, तर ५५७ व्यक्तींनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. यात ८७२३ पुरुष, तर ८३९२ महिला आहेत. १८ वर्षांवरील नागरिकांचे जिल्हाभरात विविध केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. लाभार्थ्यांनी गर्दी न करता व कोविड नियमांचे पालन करून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व समन्वयक डॉ. माधुरी माथूरकर यांनी केले आहे.