१५ ते १८ वयाेगटातील ५५ हजार मुलांचे आजपासून लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 11:58 PM2022-01-02T23:58:56+5:302022-01-02T23:59:30+5:30
काेराेनासह ओमायक्राॅनचा संसर्ग सर्वत्र वाढत असून जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात साेमवारपासून १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांना काेराेना लस टाेचली जाणार आहे. यासाठी आराेग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा रुग्णालय, अल्पसंख्याक वसतिगृह यासह लाखनी, अड्याळ, लाखांदूर, पवनी, माेहाडी, सिहाेरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणि तुमसर व साकाेली येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील १५ ते १८ वयाेगटातील ५५ हजार ७५५ मुलांच्या लसीकरणाला साेमवारपासून प्रारंभ हाेत आहे. यासाठी आराेग्य विभाग सज्ज झाला असून जिल्हा रुग्णालयासह दहा ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन नाेंदणीला १ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे.
काेराेनासह ओमायक्राॅनचा संसर्ग सर्वत्र वाढत असून जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात साेमवारपासून १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांना काेराेना लस टाेचली जाणार आहे.
यासाठी आराेग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हा रुग्णालय, अल्पसंख्याक वसतिगृह यासह लाखनी, अड्याळ, लाखांदूर, पवनी, माेहाडी, सिहाेरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणि तुमसर व साकाेली येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. माधुरी माथुरकर यांच्या नेतृत्वात ही माेहीम जिल्हाभर राबविली जाणार आहे. १५ ते १८ वयाेगटातील मुलांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी काेराेनाचे तब्बल चार रुग्ण वाढल्यानंतर प्रशासन अधिकच गंभीर बनले आहे. सर्वच वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण हाेणे आता नितांत गरजेचे झाले आहे.
काेव्हॅक्सिन लसच मुलांना देणार
- १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांसाठी केवळ काेव्हॅक्सिन लस वापराच्या सूचना आराेग्य संचालनालयाने दिल्या आहे. वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्यूनायझेशन एनटीएजीआय यांनी केवळ काेव्हॅक्सिन लसीची सूचना दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ या वयाेगटाला काेव्हॅक्सिन लसच टाेचली जाणार आहे.
काेविन सिस्टिमवर नाेंदणीची सुविधा
- लसीकरणासाठी २००७ वा त्यापूर्वी जन्म झालेले मुले पात्र राहणार आहेत. त्यांना काेविन सिस्टिमवर स्वत:च्या माेबाइल नंबरद्वारे लसीकरणासाठी नाेंदणी करता येईल. ही सुविधा १ जानेवारीपासून उपलब्ध झाली आहे. तसेच लसीकरण केंद्राच्या ठिकाणीही जाऊन नाेंदणीचीही सुविधा उपलब्ध राहणार आहे. याचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रिकाॅशन डाेस १० जानेवारीपासून
- हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींसाठी १० जानेवारीपासून प्रिकाॅशन डाेस दिला जाणार आहे. या डाेससाठी लाभार्थ्यांने दुसऱ्या डाेसच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असावे. सहव्याधी व्यक्तींनी डाॅक्टराच्या सल्ल्याने लसीकरण करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.