चढत चाललाय जिल्ह्यात लसीकरणाचा ग्राफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:22+5:302021-05-28T04:26:22+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच हादरा दिल्याने, यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी शासन आता लसीकरणावर जोर ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच हादरा दिल्याने, यापुढे असा प्रकार घडू नये, यासाठी शासन आता लसीकरणावर जोर देत आहे. यासाठीच आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून जास्तीत जास्त नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. यामुळेच बुधवारपर्यंतची आकडेवारी बघता, जिल्ह्यात २३३७९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित असल्याने नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे.
मागीलवर्षी कोरोनाने चांगलाच कहर केला होता. मात्र, तेव्हा कोरोनाशी दोनहात करण्यासाठी औषध हाती नसल्याने कोरोनाला आपली मनमर्जी करता आली होती. मात्र, भारतातच तयार दोन लसी कोरोनाला मात देण्यासाठी तत्पर असल्याने १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधात लढा सुरू झाला आहे.
मात्र, नागरिकांकडून या लसींना घेऊन मनात भीती व संभ्रम निर्माण झाल्याने लसीकरणाला पात्र असूनही कित्येक नागरिक भीतीपोटी लस घेत नसल्याचेही तेवढेच सत्य आहे. हेच कारण आहे की, अपेक्षेच्या तुलनेत कमी प्रमाणात लसीकरण झाले. नेमका हाच डाव हेरून कोरोनाने आपल्या दुसऱ्या लाटेत कहर केला. आता मात्र कोरोनाला घालवण्यासाठी व पुढे अशी संधी मिळू नये यासाठी शास्त्रज्ञांनी जास्तीत जास्त लसीकरण हाच पर्याय असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार शासनाकडून आता लसीकरणावर जोर दिला जात असून, जिल्ह्यातही त्यादृष्टीने केंद्रे वाढवून व शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी धडपड सुरू आहे. यातूनच आतापर्यंत २३३७९७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शिवाय, आता शहरी भागात नागरिक लसीकरणासाठी स्वत: पुढे येत असल्याचे चांगले चित्रही दिसून येत आहे.
ग्रामीण भागात अल्प प्रतिसाद
कोरोना लसीबाबत आजही कित्येक नागरिकांत भीती व संभ्रम आहे. यामुळेच ते लस घेणे टाळत असून लस घेतल्याने भलतेच काही होत आहे, असा त्यांचा समज झाला आहे. यामुळे ग्रामीण भागात लसीकरण कमी होत आहे. मात्र, लस सुरक्षित असल्याने सर्वांनीच घ्यावी, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.
५१ हजार नागरिकांनी घेतला दुसरा डोस
जिल्ह्यात आतापर्यंत २३३७९७ नागरिकांनी कोरोना लसीचा डोस घेतला आहे. यात १८२४३६ नागरिकांचा पहिला डोस झाला असून, ५१३६१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये १५५४४७ नागरिकांनी कोविशिल्डचा डोस घेतला आहे, तर ७८३५० नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे.