वज्राघातापासून बचाव आवश्यक
By Admin | Published: June 23, 2017 12:25 AM2017-06-23T00:25:34+5:302017-06-23T00:25:34+5:30
जिल्हयात मागील काही वषार्पासून वज्राघाताचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये
सतर्कता हवी : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा जनजागृतीसाठी पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हयात मागील काही वषार्पासून वज्राघाताचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांमध्ये याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने जागृती व्हावी व वज्राघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करु नये या विषयी सावधानता बाळगण्यासाठी काळजी याप्रमाणे घ्यावी.
पावसाळयाच्या दिवसात शेतात असतांना शेता जवळील घराचा त्वरीत आसरा घ्यावा. पाण्यात असाल तर तात्काळ बाहेर या. झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे रहा. ओल्या शेतात रोप लावण्याचे व अन्य काम करणाऱ्या व्यक्ती अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्ती यांनी तात्काळ कोरडया व सुरक्षित ठिकाणी जावे. शेतात काम करीता असाल तर सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतला नेसल तर शक्यतो जिथे आहात तिथेच रहा. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपट अशा वस्तु अथवा कोरडा पाला पाचोडा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा, तथापि डोके जमिनीवर ठेवू नका.
धातूपासून बनलेल्या वस्तु जसे कृषि यंत्रा पासून दुर रहा. गाव, शेत, आवार, बाग-बगीचा आणि घर यांच्या भोवती तारेचे कुंपन घालू नका. ते विजेला सहजतेने आकर्षित करतो. धातुची दांडीमुठ असलेल्या छत्रीचा उपयोग करु नका. विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका, झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच जागेवर, झाडावर चढू नका. वीज वाहक वस्तूपासून दूर राहा उदा. रेडीयेटर, मेटल, लोखंडी पाईप, विद्युत उपकरणे बंद ठेवा. शक्यतो घरातच रहा. पाण्याचे नळ, फ्रिज टेलिफोन, मोबाईल यांना स्पर्श करु नका. त्यापासून दूर रहा आणि विजेवर चालणाऱ्या यंत्रापासूनही दूर रहा.
कपडे वाळविण्यासाठी सुतळी अथवा दोरीचा वापर करा. तारेचा वापर करु नका. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपआपल्या घरी वीज अटकाव यंत्रणा बसवावी. टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन, टेलिव्हिजन टॉवर यापासून दूर रहा. प्लग जोडलेले विद्युत उपकरणे हाताळू नका तथा दूरध्वनीचा अथवा मोबाईलचा वापर करुन नका. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशा वेळी वाहनातून प्रवास करु नये. चारचाकी वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनात रहावे. वाहनाच्या बाहेर थांबावे आवश्यक असल्यास, धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नका.
वृक्ष, दलदलीची ठिकाणे तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा. मोकळया आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा. एकाच वेळी जास्त व्यक्ती एकत्र राहू नका, दोन व्यक्तीमधील अंतर किमान १५ फूट असावा. सावधानता बाळगल्यास जिवीत हानी होणार नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी कळविले आहे.