मौल्यवान रेती मॅग्नीज खाणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:45 PM2018-12-03T21:45:27+5:302018-12-03T21:45:50+5:30
कोट्यवधी रूपयांची मौल्यवान रेती मॅग्नीज खाणीत भराव म्हणून गत ७० वर्षांपासून वापरील जात आहे. लाखो ब्रास रेती कायमस्वरूपी भूगर्भात गाडली जात आहे. तुमसर तालुक्यातील चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत बावनथडी नदीपात्रातून रेती आणून त्याचा भराव केला जातो. विदेशात भरावासाठी रेतीला प्रर्याय शोधण्यात आले असून मॅग्नीज खाणीत आता सीसीआर अथवा फ्लॉय अॅशचा वापर करण्याची गरज आहे.
मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोट्यवधी रूपयांची मौल्यवान रेती मॅग्नीज खाणीत भराव म्हणून गत ७० वर्षांपासून वापरील जात आहे. लाखो ब्रास रेती कायमस्वरूपी भूगर्भात गाडली जात आहे. तुमसर तालुक्यातील चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीत बावनथडी नदीपात्रातून रेती आणून त्याचा भराव केला जातो. विदेशात भरावासाठी रेतीला प्रर्याय शोधण्यात आले असून मॅग्नीज खाणीत आता सीसीआर अथवा फ्लॉय अॅशचा वापर करण्याची गरज आहे.
तुमसर तालुक्यात ब्रिटीशकालीन चिखला भूमिगत मॅग्नीज खाण आहे. जगात हॉलंडनंतर उच्चप्रतिचे मॅग्नीज याच खाणीतून मिळते. या खाणीचा विस्तार प्रचंड मोठा आहे. सध्या यंत्राने भूगर्भातून मॅग्नीज काढणे सुरू आहे. दररोज लाखो टन मॅग्नीज काढले जात आहे. भूमिगत खाण असल्याने मॅग्नीज काढल्यानंतर विहिरीसारखे खोल खड्डे तयार होतात. दरड कोसळू नये म्हणून त्यात रेतीचा भराव केला जातो. गेल्या ७० वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.
रेतीच्या भरावासाठी मॉयल प्रशासनाने महसूल विभागाला रितसर परवानगी घेतली आहे. बावनथडी नदीपात्रात उत्खननासाठी ३० वर्षासाठी लीज घेण्यात आली आहे. नदीपात्रातून ट्रॅक्टरने रेतीचा उपसा करून नदीतिरावर साठा केला जातो. तेथून जेसीबीने रेतीची उचल ट्रकमध्ये करण्यात येते. दररोज १५ ते २० ट्रक रेती भरावाकरीता नेली जाते. गत अनेक वर्षांपासून हा क्रम सुरू आहे. मॉईलचे क्षेत्र शेकडो हेक्टरमध्ये पसरले आहे. त्यात सर्रास रेतीचा भराव होत आहे. कोट्यवधीची मौल्यवान रेती कायमस्वरूपी भूगर्भात काढली जात आहे. विदेशात भरावासाठी रेतीला पर्याय शोधण्यात आला आहे.
रेतीऐवजी भरावात फ्लॅय अॅशचा तथा सीसीआरचा वापर करण्याची गरज आहे. उड्डाणपूलात भराव म्हणून फ्लॅय अॅशला केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. उड्डाण पुलावर दररोज शेकडो ट्रकची वाहतूक सुरू असताना फ्लॅय अॅश जागा सोडत नसल्याचा दावा केला जातो. त्यामुळे मॅग्नीज खाणीत दरड कोसळू नये म्हणून सुरक्षेसाठी रेतीऐवजी फ्लॅय अॅश उत्तम पर्याय होवू शकतो. एकीकडे रेतीचे भाव गगणाला भिडले आहेत. रेती मिळणे कठीण झाले आहे. पर्यावरणाचेही नुकसान रेती उत्खननाने होत आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारने पर्याय शोधण्याची गरज आहे. परंतु सध्यातरी मौल्यवान रेती भूगर्भात गडप होत असल्याचे दिसून येत आहे.
बावनथडीत खड्डेच खड्डे
बावनथडी नदीपात्रात मॉयल प्रशासनाला रेती उत्खननाची परवानगी देण्यात आली. परंतु नेमकी कोणत्या गटातून परवानगी दिली हे मात्र गुलदस्त्यात आहे. जेथे रेती उपलब्ध आहे तेथूनच थेट उत्खनन केले जाते. महसूल प्रशासन व खनिकर्म विभाग याकडे कायम दुर्लक्ष करते. केंद्र सरकारच्या खाणी असल्याने राज्य सरकारचा महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जाते. यामुळे बावनथडीच्या पात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले असून नदीत रेती नावापुरतीच शिल्लक आहे. ही पर्यावरणासाठी धोक्याची घंटा आहे. अलिकडे तहसीलदार राजेंद्र बालपांडे यांनी मॉयल प्रशासनाला जेसीबीने उत्खनन करू नये असे निर्देश दिले. मात्र आता रेतीऐवजी फ्लॅय अॅशचा पर्याय स्विकारण्याची आवश्यकता आहे.