वरठी-सातोना रस्ता राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:15 AM2021-09-02T05:15:32+5:302021-09-02T05:15:32+5:30
तुमसर : परिसरासह तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील अनेक नागरिकांना रोज नागपूरला जावे लागते. यात रुग्णांचाही समावेश असतो. भंडारा ...
तुमसर : परिसरासह तालुक्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशातील अनेक नागरिकांना रोज नागपूरला जावे लागते. यात रुग्णांचाही समावेश असतो. भंडारा शहरात अती जास्त रहदारी असल्यामुळे त्यांना नागपूरला पोहोचण्यास बराच विलंब लागतो. यामुळे वरठी (भंडारा रोड) - सातोना रस्त्याला शहापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ जोडण्याची मागणी नगरसेविका कांचन कोडवानी यांनी केली आहे
याबाबत, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुनील मेंढे यांच्यामार्फत पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दररोज असंख्य लोक बालाघाट, कटंगी तुमसर, मोहाडी ते नागपूर भंडारा बायपास मार्गाने नागपूर येथे जातात. असे अनेक रुग्ण आहेत ज्यांचे आयुष्य एक मिनिट वाचवण्यासारखे आहे, अशा लोकांना नागपूरला जाण्यासाठी भंडारा शहरातून जावे लागते. भंडारा शहराची लोकसंख्या विचारात घेता गर्दी आणि जास्त रहदारीमुळे बराच वेळ लागतो. अशा लोकांच्या वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन, वरठी (भंडारा रोड)-सातोना रस्ता शहापूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडून, अती गरजू नागरिकांची मौल्यवान ३० ते ४० मिनिटे वाचविता येतील. त्याचबरोबर २५ ते ३० किलोमीटर अंतर कमी करण्यात मदत होणार आहे. परिणामी अनेक रुग्णांवर तत्काळ उपचार करून रुग्णांचे जीव वाचविले जाऊ शकणे सहज शक्य होणार आहे. याकरिता अती तत्काळ भंडारा रोड वरठी ते सातोना शहापूर महामार्गाशी जोडणी करण्याची मागणी नगरसेविका कांचन कोडवानी यांनी नितीन गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.