शासनाच्या विविध योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:41+5:30
आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य शासनाच्या सर्व कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापण्याचा निर्णय चांगला असून यामधून शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सन्मानकक्ष उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील कृषी विकासात शेतकरी हा महत्वाचा केंद्रबिंदू ठेवून शासनाच्या विविध योजना ग्रामस्तरावर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी भंडारा तालुका कृषी विभाग कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.
भंडारा तालुका कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, महिला बालकल्याण अधिकारी मनिषा कुरसुंगे, कृषी तांत्रिक अधिकारी शांतीलाल गायधने, भंडारा मंडळ अधिकारी दीपक आहेर, पर्यवेक्षक झंझाड, आनंद पाल आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राज्य शासनाच्या सर्व कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापण्याचा निर्णय चांगला असून यामधून शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्या, योजनांचे लाभार्थी निवड व विविध योजनांची माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी सन्मानकक्ष उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
जिल्हा कृषी अधीक्षक हिंदूराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या विविध योजना व सामूहिक गट शेती केल्यास शेतकºयांना होणारा फायदा आणि त्यातून विविध संकटांवर कशा पद्धतीने मात करता येईल, यावर मार्गदर्शन केले.
विविध योजनांच्या अंमलबजावणीत समन्वय साधून काम करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार याांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीत कृषी विभागाशी संबंधित इतर खात्यांचे प्रतिनिधी, सहकार उपनिबंधक, अग्रणी बँक व किमान तीन प्रगतशील शेतकरी यामध्ये एका महिला शेतकºयाचा समावेश असणार आहे. या समितीच्या बैठकीस विशेष निमंत्रीत म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी व प्रांताधिकारी यांना उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. दर तीन महिन्यांनी या समितीची बैठक होणार आहे. कक्षाला भेट देणाऱ्यां शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शेतविषयक मासिके, वर्तमानपत्रे तसेच विविध योजनांची परिपत्रके ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी अधिकाºयांनी दिली.
संचालन आत्माचे सतीष वैरागडे यांनी तर, आभार प्रदर्शन कृषी सहायक रेणूका दराडे यांनी केले.
अशी असेल तालुकास्तरीय समिती
शेतकरी सन्मान कक्षाच्या अध्यक्षपदी तहसीलदार तर सदस्य सचिवपदी तालुका कृषी अधिकारी व उर्वरीत सदस्यांमध्ये गटविकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी अधिकारी, महावितरण अभियंता, अग्रणी बँक प्रतिनिधींसह तालुक्यातील तीन प्रगतीशील शेतकरी त्यामध्ये एका महिला शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यास शेतकरी सन्मान कक्ष फायदेशिर ठरणार आहे.