वरुणराजाची वक्रदृष्टी: शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

By admin | Published: June 27, 2016 12:38 AM2016-06-27T00:38:50+5:302016-06-27T00:38:50+5:30

हवामान खात्याने मान्सून आल्याची दिलेली बातमी आणि पावसाच्या आगमनाच्या दूरदर्शनवर आलेले वृत्त बघून ...

Varunaraja's Kafranchi: The farmers' water ran away | वरुणराजाची वक्रदृष्टी: शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

वरुणराजाची वक्रदृष्टी: शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

Next

दुबार पेरणीचे संकट : अर्दळा भरल्या गर्दळा? रोहिणी आणि मृग नक्षत्रांनी दगा दिला
भंडारा : हवामान खात्याने मान्सून आल्याची दिलेली बातमी आणि पावसाच्या आगमनाच्या दूरदर्शनवर आलेले वृत्त बघून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. ओलिताची साधने असलेल्या काही शेतकऱ्यांनी ६३५ हेक्टर पऱ्हे घातलेत. हलक्या पावसाने पेरलेले बियाणे कोंब घेऊन आहे. पावसाच्या हुलकावणीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
गतवर्षी दुष्काळी परिस्थितीने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळा असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाळा जास्त असल्याने आणि पाऊस लागून पडला तर पेरण्या करणे कठीण जाणार, या भीतीने जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच शेती मशागतीचे कामे करून ठेवली आहे.
मान्सून विदर्भात दाखल होताच पेरण्या करण्यासाठी शेतकरी तयार होता. १६ जूनला हवामान विभागाने विदर्भा मार्ग मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे वृत्त प्रसार माध्यमाद्वारे प्रकाशित केले. वृत्त वाहिन्यांनी तर नागपुरात पाऊस कोसळत असल्याचे दाखविले. त्यामुळे मान्सूनचे आगमन विदर्भात झाल्याचे मानून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी १५ ते २० जूनच्या दरम्यान भराभर पेरण्या आटोपून घेतल्या. याच कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझीम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला होता. तो पाऊसच शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. पावसाने हुलकावणी दिल्याने मातीच्या पोटात फुगलेले बियाणे कडक उन्हामुळे अंकुर घेऊन कोमेजून गेले. पिकांची ही स्थिती पाहून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. गेल्यावर्षी दुष्काळाच्या झळा सोसून कोमेजलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी कशीबशी शेती उभी करण्याचा प्रयत्न केला होता. पावसाच्या दग्याने तो आता जमिनदोस्त झाला आहे. (नगर प्रतिनिधी)

बियाणासाठी मदत देण्याची मागणी
संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने आणि ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. ओढून तोडून आणलेला हातचा पैसा आता संपला आहे. दुबार पेरणीसाठी आता बियाणे कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या हवामान खात्यानेच चुकीचे अंदाज वर्तवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याने शासनाने आता तलाठ्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे पुरवावे, अशी मागणी कॉग्रेसचे जिल्हा महासचिव प्रेमसागर गणविर यांनी केली आहे.

पुरुषोत्तम डोमळे सानगडी
शेतकऱ्यांना मागील काही दिवसांपासून ग्रहण लागले. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ. प्रत्येक वेळी न भरून निघणारे नुकसान होत आहे. यंदा रोहिणी व मृग नक्षत्र दोघेही बहीण भाऊ रुसले. पावसाची चिन्हे नाहीत. अर्दळा नक्षत्र लागला तरी गर्दळा भरल्या नाहीत. हवामान खात्याने काही दिवस पाऊस पडणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे खरीप हंगाम पुन्हा धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरीपाची पेरणी केली. हंगामाच्या सुरुवातीला अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होता. त्यानंतर पावसाने आपले उग्ररुप दाखविल्यामुळे जिल्ह्यात चार वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. शेतीमध्ये तलावासारखे पाणी साचून होते. काही जणांनी कसेबसे शेतपिक पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही. अतिवृष्टीची नोंद शासनदरबारी करण्यात आली. शासनाची मदत शेतकऱ्यांचे आसवे पुसू शकली नाही. त्यानंतर रबी पिकांचे वेळी पावसाने दगा दिला. ऐन पीक कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकऱ्यांनी रबी हंगामातही फेडू शकले नाही. मागील वर्षी झालेले नुकसान यंदा तरी भरून निघेल, या आशोने शेतकरी मोठ्या उत्साहाने यावर्षी खरिपासाठी तयार झाला आहे. मशागतीची कामे आटोपली. कठीण असलेली पैशाची जुळवाजुळव केली. बियाणे खताची खरेदी केली. रोहिणी व मृगाचा पाऊस पडला की जोमात पेरणी करायची असा मानस होता. मात्र पावसाने दगा दिला.
पंधरवडा उलटला तरी पावसाचे चिन्हे नाहीत. आता मृगानंतर आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली असून आतापर्यंत गर्दळा भरल्या नाहीत. शेती कशी करायची असा शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. आता तरी दमदार पाऊस पडेल अशी वरुणराजाकडे आशा व्यक्त करीत आहेत. देवाला साकडे सुद्धा घालत आहेत. परंतु वरुण राजाची कृपादृष्टी केव्हा होणार हे कुणालाच ठाऊक नाही. आणखी काही दिवस पाऊस पडणार नाही, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

Web Title: Varunaraja's Kafranchi: The farmers' water ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.