कृषी विभागातर्फे होणार जिल्ह्यात रानभाज्या महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:01:14+5:30
भंडारा येथील महोत्सवासाठी पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन तसेच कृषी विभागाचे अधिकारी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच कर्मचारी, शेतकरी उपस्थित राहणार आहेत. रानभाज्या महोत्सव प्रत्येक तालुका कृषी कार्यालय स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सात्या (मशरूम), शेर डीरे, पोई, तरोटा, काटवल , पातूर, कुंड्याची फुलं, गुळवेल, शेवगा, पाथरी सुरण, गुळवेल, खापरखुट्टी, तांदूळजा अशा अनेक रानभाज्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वनसंपदा विपुल प्रमाणात असलेल्या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होताच निसर्गाकडून परिसरात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आढळून येतात. औषधी गुणधर्माने परिपूर्ण आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणाºया या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व, पाककृती शहरी भागातील लोकांना माहिती होण्यासाठी जिल्हा कृषी विभागातर्फे मंगळवार ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भंडारा तालुका कृषी कार्यालयासमोरील पटांगणात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यात रविवारी ९ ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सव होणार आहे.
भंडारा येथील महोत्सवासाठी पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन तसेच कृषी विभागाचे अधिकारी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच कर्मचारी, शेतकरी उपस्थित राहणार आहेत. रानभाज्या महोत्सव प्रत्येक तालुका कृषी कार्यालय स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सात्या (मशरूम), शेर डीरे, पोई, तरोटा, काटवल , पातूर, कुंड्याची फुलं, गुळवेल, शेवगा, पाथरी सुरण, गुळवेल, खापरखुट्टी, तांदूळजा अशा अनेक रानभाज्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. मात्र अनेकांना याबद्दल आजही माहिती नाही. या रानभाज्यांची अधिकाधिक ग्राहकांना तसेच पुढील पिढीला माहिती व्हावी, शहरातील नागरिकांना सहजासहजी उपलब्ध न होणाºया रानभाज्या या महोत्सवातून कृषीविभाग त्या रानभाज्यांच्या गुणकारी माहितीसह उपलब्ध करून देणार आहे. यामधून ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसह विविध महिलांना यामधून रोजगार निर्मितीसाठीही हातभार लागणार आहे.
पावसाळ्यात शेतीच्या बांधावर, जंगल परिसरात सहजपणे उगवणाऱ्या या रानमेवा याबद्दलची माहिती गावातील वयोवृद्ध, जुन्या जाणकार व्यक्तींना खडानखडा माहिती आहे. मात्र परिसरात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या रानफुले औषधी वनस्पतींची माहिती पुढच्या पिढीला नाही. त्यामुळे सुदैवाने जिल्ह्यात उपलब्ध असलेला रानभाज्या दुर्लक्षित आहे. ग्राहकांकडून रानभाज्यांना मोठी मागणी असतानाही वेळेवर शहरात उपलब्ध होत नाही. त्यामुळे कृषी विभागाच्या पुढाकारातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तर दुसरीकडे शहरातील ग्राहकांना या रानभाज्या उपलब्ध करून देण्यासाठी महोत्सवाचे प्रत्येक तालुकास्तरावर कृषी विभागाच्या कार्यालय परिसरात आयोजन करण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड यांनी सांगितले.
यासाठी गत आठवडाभरापासून कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, अनुभवी वयोवृद्ध शेतकºयांकडून रानभाज्या, रानफुले औषधी वनस्पतींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले शेतावर तसेच जंगल परिसरातील गावांना भेटी देत माहिती जाणून घेत आहेत.
कृषी कर्मचारी देणार रानभाज्यांची माहिती
जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात सहजपणे उपलब्ध होणाºया सुरण, जंगली काटवल, पखानभेद,खापरखुटी तरोटा, सात्या या रानभाज्या आरोग्यासाठी प्रचंड गुणकारी आहेत. पावसाच्या सुरुवातीला उपलब्ध होत असलेल्या या रानभाज्यांचे महत्त्व गुणवैशिष्ट्ये हे पुढील पिढीलाही माहिती होण्याची नितांत आवश्यकता आहे. शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक, विटामिन्स,पुरेशी खनिजे याबद्दलची माहिती या रानभाज्या महोत्सवातून शहरवासीयांना होणार आहे यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी, तसेच महिला बचत गटांनी रानभाज्या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.
जंगल परिसरासह शेत शिवारात आढळणाऱ्या या रानभाज्यांवर कोणत्याही प्रकारची कीटकनाशके, रासायनिक खतांचा वापर नसल्याने यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने खनिजे, प्रथिने, औषधी गुणधर्म विपुल प्रमाणात असतात. या रानभाज्यांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवून शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन प्रत्येक तालुकास्तरावर करण्यात येत आहे.
- मिलिंद लाड,
उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.