भाजीपाला उत्पादक अडकले अस्मानी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:59 AM2018-02-19T00:59:37+5:302018-02-19T01:02:46+5:30
परंपरागत धान उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासह पालेभाज्या पिकांची शेती केली. मात्र मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या फटक्याने भाजीपाला उत्पादक अस्मानी संकटात सापडल्याने त्यांचा आर्थिक कोंडमारा झाला आहे.
प्रशांत देसाई ।
ऑनलाईन लोकमत
भंडारा : परंपरागत धान उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायासह पालेभाज्या पिकांची शेती केली. मात्र मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या फटक्याने भाजीपाला उत्पादक अस्मानी संकटात सापडल्याने त्यांचा आर्थिक कोंडमारा झाला आहे.
यावर्षी खरीप पिकांसह रब्बी पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला खरीपाचे पिक हातुन गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आशा न सोडता भाजीपाला उत्पादन घेवून आर्थिक स्थिती समतोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजीपाला उत्पादनासाठी लागलेला खर्चही त्यांना काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. किंबहूना झालेला खर्च निघेलच याची शाश्वती आता राहिली नाही.
खरीप हंगामात पाऊस न पडल्याने हजारो हेक्टर शेतीतील रोवणी झाली नाही. त्यामुळे धानाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादनासाठी पालेभाज्यांची शेती केली.
सध्या पालेभाज्या निघण्याचा हंगाम आहे. रब्बी पीक हातातोंडाशी आले असतानाच मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी बर्फवृष्टी झाली. यामुळे शेतातील भाजीपाल्यासह रब्बीपिकांनाही जबर फटका बसला.
अवकाळी पावसासह ढगाळ वातावरणाचा फटका बसून सुस्थितीत असलेला भाजीपाला पुर्णत: खराब झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजी उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कोबी, पत्ताकोबी, मिरची, वांगे, कारले, चवळी, पालक, मेथी, चवळी भाजी खराब होण्याच्या स्थितीत असल्याने तो विकूण मिळेल तो पैसा होईल.
या मनस्थितीने बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आणला आहे. मागील आठवड्याच्या अस्मानी संकटामुळे बाजारातही मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीला आल्याने त्याला अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला कवडीमोल दरात विकावा लागत आहे.
आधीच कर्जाच्या बोझ्यात असलेल्या शेतकऱ्यांसमोर या अस्मानी संकटाने पुन्हा आर्थिक दरी निर्माण केली. कर्जाचे दृष्टचक्र शेतकºयांच्या मानगुटीवर बसून असल्याचे चित्र सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. जिवापाळ जपून शेतात भाजीपाला किंवा रब्बी पिकाची जोपासना करुन त्याला अपेक्षीत भाव मिळेल व कर्जाची परतफेड करता येईल ही अपेक्षा मात्र अपेक्षाच राहिली आहे. सरकारी पाशात अडकलेल्या शेतकºयाच्या उत्पादनालाही आता भाव नसल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. उन्हाळा प्रारंभ झाला असून भाजीपाल्यांच्या दरात चढउतार दिसून येईल.
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात भाजीपाला सडविण्यापेक्षा बाजारात विक्रीला आणत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने त्याला दर अल्प मिळत आहे.
- बंडू बारापात्रे
अध्यक्ष बीटीबी भंडारा