भंडारा जिल्ह्यातल्या भाज्या निघाल्या सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 04:52 PM2019-11-18T16:52:14+5:302019-11-18T16:56:30+5:30
भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे.
संतोष जाधवर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाताचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यातील पालेभाज्यांना सातासमुद्रापार मागणी वाढत असून मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील भेंडी, मिरची, लौकी दररोज दुबई-कतारला रवाना होत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील शेतकरी निर्यातक्षम भाजीपाला उत्पादन घेण्याकडे वळत आहे.
भंडारा जिल्हा म्हणजे भात उत्पादन असे समीकरण झाले आहे. मात्र अलीकडे भात शेती परवडत नसल्याने शेतकरी विविध प्रयोग करीत आहे. त्यातच गत काही वर्षात पालेभाज्या उत्पादनाकडे शेतकरी वळला आहे. गुणवत्तापुर्ण पालेभाज्यांना स्थानिक बाजारातच नव्हे तर परदेशातील बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. मोहाडी तालुक्यातील हरदोली येथील सेवकराम झंझाड यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला आता सातासमुद्रापार दुबई, कतार येथे निर्यात केला जात आहे.
सेवकराम झंझाड यांच्याकडे सहा एकर शेती असून या शेतीत उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांच्या मार्गदर्शनात त्यांनी नागपूर येथे ‘वनामती’मध्ये प्रशिक्षण घेतले. तेथून खऱ्या अर्थाने निर्यातक्षम पालेभाजा उत्पादनाला सुरवात झाली. निर्यातक्षम उत्पादन घेवून त्यांनी प्रगतीचा नवा मार्ग चोखाळला आहे. नागपूर येथील मित्राय फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या शेतात पिकलेला भाजीपाला दुबई-कतार येथे निर्यात केला जात आहे. त्यातून त्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिक नफा मिळत आहे. भेंडीला स्थानिक बाजारात १५ ते १६ रुपये किलो दर मिळतो. तोच आता निर्यातीमुळे २४ रुपये किलो मिळत आहे. मिरचीतही त्यांना चांगलाच फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत निर्यातक्षम उत्पादन घेतल्यास प्रगती करणे सहज शक्य असल्याचे सेवक झंझाड सांगतात.
भेंडी उत्पादनातून चार लाख ७५ हजार नफा
सेवक झंझाड यांनी आपल्या शेतात मलचिंग पेपर आणि ठिबक सिंचनावर दोन एकरामध्ये भेंडी आणि चार एकरात मिरचीची लागवड केली होती. चार महिन्यात भेंडीचे १९ टन ७७८ किलो उत्पादन झाले. त्यातून खर्च वजा जाता चार लाख ७४ हजार रुपये निव्वळ नफा झाला. मिरचीच्या दोन तोडणीतून दोन लाख ५८ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सेवक झंझाड सांगतात.
जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम भाजीपाल्याची लागवड करण्याची गरज आहे. मलचिंग व ठिबक सिंचनाचा वापर करुन भाजीपाला पिकाचे उत्पादन वाढविता येते. कृषी विभागातील प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना फायदा होतो.
- मिलींद लाड
उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा