तीन दिवसांपासून प्रौढासह वाहनाचा पत्ता लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:10+5:302021-03-04T05:07:10+5:30
सचिन हा दुचाकी वाहन क्रमांक एमएच ४० एडब्ल्यू ६०१९ घेऊन गेला. पण घरी परतला नाही. त्याचा मोबाईलसुद्धा बंद ...
सचिन हा दुचाकी वाहन क्रमांक एमएच ४० एडब्ल्यू ६०१९ घेऊन गेला. पण घरी परतला नाही. त्याचा मोबाईलसुद्धा बंद येत असल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानक अड्याळ येथे दाखल झाली. अड्याळ पोलीस तीन दिवसांपासून त्याचा शोध घेत असले तरी आत्तापर्यंत ना दुचाकी सापडली, ना प्रौढाचा शोध लागला.
पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
सचिन हा भंडारा येथील एका फायनान्स कंपनीत लिपिक पदावर काम करीत होता. फायनान्सचे पैसे ज्या ग्राहकांनी वेळेवर भरले नाहीत, अशा ग्राहकांच्या भेटी घेणे, रक्कम घेणे असे काम पवनी, लाखांदूर, साकोली, लाखनी तालुक्यात होते. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत, तर कधी उशिरासुध्दा घरी येण्याची वेळ राहायची. सचिनने शुक्रवारपासून रविवारपर्यंत केलेली एकूण ५ लाख ५२ हजार रुपये ग्राहकांची वसुली कार्यालयात भरली नसल्याचे सांगण्यात येते. १ मार्च रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी युवक घरी येतात. लगेच सचिनसोबत जातात. १५ मिनिटात सचिन घरी परत येतो आणि पुन्हा दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घरून आपल्या दुचाकीने ऑफिसच्या कामाला निघून गेल्यावर दुपारी तीन वाजल्यापासून त्याचा फोन स्वीच ऑफ येतो. अशावेळी काही घातपात तर झाला नसावा, अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.
बॉक्स
सिसीटीव्ही कॅमेरे बंद
अड्याळमध्ये अशा प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीची मदत लाभते. पण, गावात फार मोजक्या ठिकाणीच ही व्यवस्था आहे. पण, ज्या ठिकाणी विशेषकरून बसस्थानक परिसरात नियमितपणे आवश्यक आहे, अशा ठिकाणचे कॅमेरे आजही बंद आहेत. याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने व पोलीस प्रशासन यांनी लक्ष केंद्रीत करणे गरज आहे.