बपेरा आंतरराज्यीय सीमेवर वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:45 AM2019-05-06T00:45:55+5:302019-05-06T00:46:20+5:30
नजीकच्या मध्यप्रदेशात लोकसभा निवडणुकीचे दोन चरणातील मतदान शिल्लक आहे. या शिवाय बपेरा आंतरराज्यीय सीमेवरून नक्षलग्रस्त दोन जिल्ह्याच्या सीमा हाकेच्या अंतरावर असल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. सीमेवर वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
रंजित चिंचखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : नजीकच्या मध्यप्रदेशात लोकसभा निवडणुकीचे दोन चरणातील मतदान शिल्लक आहे. या शिवाय बपेरा आंतरराज्यीय सीमेवरून नक्षलग्रस्त दोन जिल्ह्याच्या सीमा हाकेच्या अंतरावर असल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. सीमेवर वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
नजीकच्या मध्यप्रदेश राज्य शेजारी बपेरा आंतरराज्यीय सीमा हाकेच्या अंतरावर आहे. या सीमेच्या लगत नक्षलग्रस्त बालाघाट आणि गोंदिया जिल्ह्याची सीमा आहे. यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ही सीमा प्रशासन 'सिल' करीत आहेत.
या सीमेवर यापुर्वी पोलीस चौकी तैनात असताना निवडणूक प्रशासनाने स्वतंत्र पोलीस तैनात करीत आहे. पोलीस चौकी आणि राहुटी मधील पोलीस बपेरा आंतरसीमेवर नियुक्त करण्यात आली आहे. सीमेवर पोलिसांचा जमावडा असल्याचे चित्र आहे.
नजीकच्या मध्यप्रदेशात दोन चरणातील मतदान शिल्लक आहे. या शिवाय गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचे कारवाया वाढल्या असल्याने सीमेवरील पोलिसांना अलर्ट राहण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत.
बपेरा आंतरराज्यीय सीमेवर महाराष्ट्रातून जाणारे आणि मध्यप्रदेशातून येणाऱ्या चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील प्रथम टप्प्याच्या चरणातील मतदानाच्या कालावधीत याच आंतरसीमेवर पोलिसांनी एका वाहनांतून लाखो रुपये जप्त केले होते. परंतु नंतर ही राशी परत करण्यात आली होती. याशिवाय अवैध साहित्य, अमली पदार्थ तथा नशायुक्त साहित्याच्या आयातीवर पोलीसांची करडी नजर आहे. साहित्याची तपासणी करण्यात येत आहे. यामुळे सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे धरण मार्गावरून वाहनाची रेलचेल वाढली आहे. या मार्गाकडे प्रशासनाचे लक्ष नाही. यामुळे अवैध व्यवसायीकांना हा मार्ग 'सोने पे सुहागा' ठरत आहे. याच मार्गावरून गांजा या अमली पदार्थाची आयात करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना अलीकडे अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिली होती. या व्यवसायातील आरोपी सिहोरा गावातील होते. यामुळे या परिसरात अवैध व्यवसायीकांचे जाळे असल्याचे समोर आले आहे. निवडणूक निमित्ताने पोलीस आंतरराज्यीय सीमेवर करडी नजर ठेऊन आहेत.
पोलीस ठाण्याची धुरा प्रभारींच्या खांद्यावर
सिहोरा पोलीस ठाणेमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक एका मागून एक निलंबित होत आहे. वादग्रस्त पोलिसांचे स्थानांतरण होत आहेत. यामुळे पोलीस ठाणे चर्चेत आहे. ५३ पोलिसांची पदे असताना केवळ २५ कार्यरत आहेत. या कार्यरत पोलिसांपैकी अर्धे अधिक अनुपस्थितीत आहेत. ४-५ पोलीस ४७ गावांची सुरक्षा करीत आहेत. एका पोलिसांचे खांद्यावर ३५ गावांची जबाबदारी आहे. यामुळे काम आणि तपासाचा ताण त्यांच्या खांद्यावर आहे. पोलीस निरीक्षकाचे पद प्रभारीचे मानगुटीवर देण्यात आले आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.
पोलीस चौकीचे काय?
बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकीचा शुभारंभ तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांचे हस्ते करण्यात आले आहे. दुसºयाच दिवशी चौकी कुलूपबंद ठेवण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. चौकी सांभाळणारे पोलीस नाही. यामुळे ही चौकी हशांचे पात्र ठरली आहे. सध्या बिट अमलदाराची नियुक्ती या चौकीत करण्यात आली आहे. परंतु चौकीला कधी कुलूप लावण्यात येईल सांगता येत नाही. पोलिसांची रिक्त पदे नियोजनबद्धरित्या नियुक्ती करण्याची ओरड परिसरात सुरु आहे. नवीन ठाणेदाराची नियुक्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.