भंडारा जिल्ह्यात फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 03:23 PM2020-08-07T15:23:55+5:302020-08-07T15:25:21+5:30
रस्त्यावर अचानक आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावल्याने फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले. ही घटना तुमसर-बपेरा मार्गावरील बिनाखीजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रस्त्यावर अचानक आलेल्या माकडाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार ब्रेक लावल्याने फिरत्या वैद्यकीय पथकाचे वाहन उलटले. या वाहनातील सहा व्यक्ती थोडक्यात बचावल्या. ही घटना तुमसर-बपेरा मार्गावरील बिनाखीजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता घडली.
नॅशनल मोबाईल मेडिकल युनिटचे वाहन (क्रमांक एमएच ३६ - २१४२) गुरूवारी सकाळी तुमसर तालुक्यातील खापा येथून धानोडा, धुटेरा येथे जात होते. या वाहनात सहा जणांचे आरोग्य विभागाचे पथक प्रवास करीत होते. त्यात चार महिला आणि चालकासह दोन पुरूषांचा समावेश आहे. बिनाखी गावाजवळ या वाहनाच्या समोर अचानक माकड आले. माकडाला वाचविण्यासाठी चालक चंद्रशेखर वानखेडे यांनी जोरदार बे्रक लावले. मात्र वाहन अनियंत्रित होवून एका झाडाला धडक दिली आणि रस्त्याला कडेला जावून उलटले. एवढा मोठा अपघात होवूनही या वाहनात असलेल्या सहाही कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना मदत केली. सदर वाहन भंडारा येथील असून गावागावात जावून नागरिकांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करते. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना यानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तुमसर येथे नेण्यात आले.