भंडारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहने ठरताहेत वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:36 AM2021-03-17T04:36:11+5:302021-03-17T04:36:11+5:30

भंडारा शहरातील काही भागात रस्त्यांवरच अनेकदा वाहने उभी दिसून येत असल्याने वाहतुकीला धोकादायक ठरू शकतात. मात्र, असे असताना ...

Vehicles on internal roads in Bhandara city are a hindrance to traffic | भंडारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहने ठरताहेत वाहतुकीस अडथळा

भंडारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहने ठरताहेत वाहतुकीस अडथळा

googlenewsNext

भंडारा शहरातील काही भागात रस्त्यांवरच अनेकदा वाहने उभी दिसून येत असल्याने वाहतुकीला धोकादायक ठरू शकतात. मात्र, असे असताना नागरिकांकडून कोणतीच तक्रार केली जात नसल्याचे हे वास्तव समोर येत आहे. वाहतूक पोलीस अंतर्गत रस्त्यांवर कारवाई करत नाही, यामुळे वाहनमालकांची हिंमत आणखीनच वाढली आहे. अशा वाहनांवर कारवाई केली पाहिजे. भंडारा नगर परिषदेने रस्त्यांवर उभ्या असलेल्या व वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या वाहनांची शोधमोहीम राबवून त्यावर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे. भंडारा नगर परिषदेकडून गेल्या काही दिवसात अशा वाहनांवर वा अतिक्रमण केलेल्यांवर कारवाईची मोहीम राबवली गेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यासोबतच रस्त्याकडेला असलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्नही निर्माण झाला आहे. भंगार वाहने शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. जास्त वेळ रस्त्यावरच थांबलेल्या वाहनांना नगर परिषद, भंडारामार्फत नोटीस देण्याची गरज आहे. अशी वाहने तत्काळ न हटविल्यास दंड आकारून कारवाई करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून अशी अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक भंडाराकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

बॉक्स

साई मंदिर मार्गावर गतिरोधक तयार करा

भंडारा शहरातील महत्त्वाच्या साई मंदिर मार्गावर गतिरोधक तयार करावा, अशी अनेक दिवसांपासून नागरिकांतून मागणी होत आहे. रस्त्यांवर अनेकदा वाहतूक कोंडी होते. याशिवाय या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. भरधाव वाहनांमुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. गत आठवड्यात एका बालकाचा थोडक्यात अपघात होताना बालक बचावल्याची घटना घडली. याशिवाय सामाजिक न्याय भवनासमोर चौ रस्ता असल्याने येथे पादचाऱ्यांना वाहनांचा नेमका अंदाज येत नाही. याशिवाय येथे स्वच्छतागृह नसल्यानेही अनेकांची तारांबळ उडते.

कोट

साई मंदिर हा मार्ग भंडारा शहरातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने अतिशय भरधाव वेगाने येतात. त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांचा विचार करता सामाजिक न्याय भवनासमोरील कॅनॉल रोड व साई मंदिर रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक तयार करण्याची गरज आहे.

आशिष खेडेकर, युवक, भंडारा.

बॉक्स

रस्त्यांचा व अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

भंडारा शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे दिसून येतात. त्यातच रस्त्याकडेला उभी असलेली वाहने अपघाताला आमंत्रण देत आहेत. यासोबतच अस्वच्छता पसरत असून परिसरात अनेकांची वाहने बाजूला घेण्यावरून अनेकदा वारंवार भांडणेही होत आहेत. यासोबतच रस्त्याकडेला आपले घरगती सामान ठेवणारे लोकही परिसरातील नागरिकांना जाताना अरेरावी करतात. भंडारा शहरात काही रस्त्यांवर घरासमोर वाहने लावलेले असतात. त्यामुळे विनाकारण जागा वाढवली जात असल्याने वाहतुकीस अडथळा ठरतात. शिवाय वाहन काढण्यास सांगितले असता अनेकदा वादविवाद होतात. नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Vehicles on internal roads in Bhandara city are a hindrance to traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.