विक्रेत्यांना दर दहा दिवसांनंतर करावी लागणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:33 AM2021-05-22T04:33:20+5:302021-05-22T04:33:20+5:30
लाखनी : नगरपंचायत क्षेत्रासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अधिक दिसून येत आहेत. त्यावर अंकुश लावत कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी आपत्ती ...
लाखनी : नगरपंचायत क्षेत्रासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण अधिक दिसून येत आहेत. त्यावर अंकुश लावत कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे लाखनीचे तहसीलदार मल्लिक विरानी यांनी विक्रेत्यांना दर दहा दिवसानंतर कोरोना चाचणीचे आदेश काढून नवीन सूचना निर्गमित केल्या आहेत. तालुक्यात जीवनाश्यक बाबींची दुकाने सोडून इतर दुकाने बंद राहणार आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने दर मंगळवारला पूर्णपणे बंद राहणार आहेत. इतर दिवशी सकाळी ७ ते ११ पर्यंत दुकाने सुरु राहतील. शासकीय व खासगी दवाखाने, सर्व मेडिकल दुकाने, सर्व पॅथॉलॉजी केंद्र, दुग्ध संकलन केंद्र , नाश्ता, जेवणाची पार्सल रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. कोंबडी, मांस, मटनाची दुकाने मंगळवार सोडून इतर दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. चष्म्याची दुकाने मंगळवार सोडून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
खासगी दवाखाने, सर्व प्रकारची दुकाने, फळे, भाजीपाला विक्रेते, मांस, मटन विक्रेते मालक व इतर काम करणारे कामगार, नोकर व हमाल यांना दर दहा दिवसांनी कोरोना चाचणी करून प्रमाणपत्र सोबत ठेवणे अनिवार्य असल्याचे आदेश दिले आहेत. बंद असणारी दुकाने सुरू केल्यास, विहित वेळेनंतर सुरू असणारे दुकाने यांच्यावर दंडात्मक प्रसंगी फौजदारी कारवाई महसूल पथक, पोलीस पथक, नगरपंचायत व ग्रामपंचायतचे प्रशासकीय पथक यांनी करावयाचे आहेत, असेही सांगितले आहे.