मामानेच घेतला भाचीचा बळी
By admin | Published: February 1, 2016 12:36 AM2016-02-01T00:36:24+5:302016-02-01T00:36:24+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेटोला येथील शेतशिवारात २४ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.
नोंदविला कबुली जबाब : प्रकरण आंबेटोला येथील खुनाचे
तुमसर : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आंबेटोला येथील शेतशिवारात २४ वर्षीय महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. हत्या करणारा सख्खा मामाच असल्याचे उघडकीस आले असून आपल्या भाचीचाच त्याने बळी घेतला.
गोबरवाही पोलिसांनी ३० जानेवारीला आरोपीला त्यांच्या राहते गाव चिखली येथून गजाआड केले. ओमप्रकाश तिगन कुंभरे (४५) रा. चिखली असे मारेकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील डोंगरी (बुज) येथे प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला सोमवारला आठवडी बाजार भरत असल्याने बाजाराकरिता घरुन निघालेली ज्योती अर्जून टेकाम (२४) ही घरी रात्री उशिरापर्यंत पोहचली नसल्याने तिचा शोध घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आंबेटोलाच्या शेतशिवारात आढळला. एक वर्षापूर्वी तिचा पती दगावल्याने ती आपल्या आईसोबत चिखली गावात राहून डोंगरी (बु.) येथे मॉयलमध्ये कंत्राटीवर मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होती. त्याच गावात ज्योतीचा मामा ओमप्रकाश कुंभरे चे वास्तव होते. दरम्यान तिच्या चारित्र्याबाबत गावात चर्चा होत असल्याने ओमप्रकाशने याबाबत बहिणीला व भाचीला हटकले होते. ‘घटनेच्या दहा ते पंधरा दिवसाआधी चिखली गावात क्रीडासत्राचे आयोजन असल्याने भाचीचा देवनारा येथील प्रियकर हा चिखली गावात आला. ही बाब दुसऱ्या दिवशी मामा ओमप्रकाश याला कळताच त्याने भाचीच्या घरी जावून तिच्या प्रियकराला व भाचिला यापुढे तुम्ही दिसलात तर जिवानिशी संपवेन अशी धमकीही दिली होती. घटनेच्या दिवशी ज्योती ही डोंगरी बु.ला आठवडी बाजाराकरीता गेली असता परतीच्या वेळेत ती व तिचा प्रियकर सायकलने येत असताना ओमप्रकाशला दिसले. प्रियकराने तिला तिथेच सोडून पळ काढला. ज्योती ही मामा ओमप्रकाशसह सायकलने चिखली येथे येत असतांना वाटेत भाचीला समजाविण्याचा प्रयत्न केला. वाद झाल्याने ओमप्रकाशने तिच्या डोक्यावर व कपाळावर दगडाने वार केला. नंतर तिच्या साडीने गळा आवळून हत्या केली असल्याचा कबुली जवाब ओमप्रकाशने पोलिसांना दिला. तपास गोबरवाहीचे पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे करित आहेत. (शहर प्रतिनिधी)