दर्जा पर्यटन स्थळाचा, पण मंदिरात जाण्यासाठी रस्ताच नाही; भाविक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 03:28 PM2022-05-19T15:28:27+5:302022-05-19T15:56:52+5:30
दरवर्षी नदीपात्रात यात्रा भरते. अण्णाजी महाराजांची पुण्यतिथीसुद्धा साजरी करण्यात येते. त्यामुळे हजारो भाविक येतात. परंतु त्यांना रस्त्याअभावी नदीपात्रातून मार्गक्रमण करावे लागते.
मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : विदर्भाची मिनी पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या माडगी येथील नृसिंह मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला असला तरी येथे सुविधांची वानवा आहे. मंदिरात जाण्याकरता साधा रस्ता नाही. त्यामुळे मंदिरात जाताना भाविकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
तुमसर तालुक्यातील माडगी येथील नदीपात्रात दोनशे फूट शिळेवर भगवान नृसिंह यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. संपूर्ण भारतात मोजक्या ठिकाणी नृसिंहाचे मंदिर आहे. परंतु या मंदिरात जाण्याकरता साधा रस्ता तयार करण्यात आला नाही. त्यामुळे भाविकांना जाण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागतो. नदीपात्र विस्तीर्ण असल्यामुळे रेतीमधून मार्गक्रमण करावे लागते. नदीपात्रात दगड आहेत. उन्हाळ्यात उष्णतेमुळे पायाला चटके बसतात.
दरवर्षी नदीपात्रात यात्रा भरते. अण्णाजी महाराजांची पुण्यतिथीसुद्धा साजरी करण्यात येते. त्यामुळे हजारो भाविक येतात. परंतु त्यांना रस्त्याअभावी नदीपात्रातून मार्गक्रमण करावे लागते.
'क' दर्जाचे पर्यटनस्थळ
''राज्य शासनाने नृसिंह मंदिर स्थळाला क दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केला आहे. आतापर्यंत मंदिर परिसरात सुमारे ६० ते ७० लाखांची विकास कामे झाली आहेत. काही प्रमाणात मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु मुख्य रस्ता बांधकाम येथे रखडलेले आहे.
अंदाजपत्रकात तरतूद नाही
राज्य शासनाच्या २०२२ च्या अंदाजपत्रकात या स्थळाला निधी दिला नाही. चांदपूर व गायमुख या स्थळाला निधी दिला आहे. गत पंधरा ते वीस वर्षांपासून या स्थळाची उपेक्षा सुरू आहे. तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर पर्यटन स्थळ असून येथे एमटीडीसीच्या माध्यमातून नदीपात्रात बोटींची सुविधा उपलब्ध झाल्यास स्थानिक रोजगार यांना येथे रोजगार मिळण्यास मदत होऊ शकते. परंतु लोकप्रतिनिधींचे येथे कायम दुर्लक्ष दिसत आहे.
माडगी येथील मंदिर जागृत स्थळ आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. परंतु या स्थळाचा विकास झाला नाही. पर्यटन स्थळाचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल.
बाळा मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता, देव्हाडी