विदर्भवादी पक्ष एकत्रित पोटनिवडणूक लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 10:52 PM2018-05-09T22:52:57+5:302018-05-09T22:53:08+5:30
भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रात २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या उद्देशाने अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन उमेदवार लढविण्याचा एकमताने निर्णय घेतला असल्याचे माजी महाधिवक्ता विदर्भ राज्य आघाडीचे अॅड.श्रीहरी अणे आणि विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रात २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या उद्देशाने अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन उमेदवार लढविण्याचा एकमताने निर्णय घेतला असल्याचे माजी महाधिवक्ता विदर्भ राज्य आघाडीचे अॅड.श्रीहरी अणे आणि विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
यावेळी तिरपुडे म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे आमिष दाखवून विदर्भात भरघोस यश मिळविणाºया भाजपने स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसह कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसताना विदर्भ राज्याची मागणी थेट मतदारामार्फत मतपत्रिकेच्या माध्यमातून शासनकर्त्यांपर्यंत पाठविण्याच्या अनुषंगाने विदर्भवादी नेत्यांनी एकत्रितपणे निवडणुकी लढण्याचे ठरविले आहे. उद्या गुरूवरला विदर्भवादी पक्षाचा उमेदवार अक्षय पांडे हे नामांकन दाखल करणार आहेत. सर्व विदर्भवादी पक्षनेत्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार उमेदवार हा पूर्णपणे विदर्भवादी असेल व विदर्भ राज्य निर्मिती व विकासाच्या मुद्यावर मते मागितली जातील. विदर्भाच्या विषयावर विदर्भातील जनतेने राजकीय पक्षांना कशाप्रकारे प्रतिसाद दिला व विजयानंतर हे पक्ष वेगळ्या विदर्भ निर्मितीला कसे विसरले हे प्रचारादरम्यान मतदारांना सांगण्यात येईल. नवनिर्वाचित खासदारांना केवळ आठ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असल्यामुळे विदर्भाचा व्यक्ती विदर्भाकरिता निवडून देण्याचे आवाहन करण्यात येईल. विदर्भाबाबत विविध राजकीय पक्षांनी दिलेली आश्वासने ही जनतेसमोर मांडण्यात येतील, असेही तिरपुडे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला अॅड.नीरज खांदेवाले, डॉ.नितीन तुरस्कर, दुर्वास धार्मिक, अॅड.पद्माकर टेंभुर्णीकर उपस्थित होते.