नोकरभरतीवर आधी विदर्भातील बेरोजगारांचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 10:32 PM2018-06-10T22:32:46+5:302018-06-10T22:37:39+5:30
मागील ६० वर्षे महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या हिस्याच्या नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना दिल्या. आता मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या असून या संपूर्ण नोकऱ्यांवर विदर्भातील बेरोजगार तरूण तरूणींचा अधिकार आहे. त्या विदर्भाला मिळविण्यासाठी विदर्भ गर्जनाने सुशिक्षित बेरोजगारांच्यावतीने एक उपक्रम हाती घेऊन शासनाविरूद्ध लढा पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागील ६० वर्षे महाराष्ट्र सरकारने विदर्भाच्या हिस्याच्या नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील युवकांना दिल्या. आता मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या असून या संपूर्ण नोकऱ्यांवर विदर्भातील बेरोजगार तरूण तरूणींचा अधिकार आहे. त्या विदर्भाला मिळविण्यासाठी विदर्भ गर्जनाने सुशिक्षित बेरोजगारांच्यावतीने एक उपक्रम हाती घेऊन शासनाविरूद्ध लढा पुकारला आहे. याकरिता विदर्भ गर्जना युवकांची चळवळ उभारून महाविद्यालयीन तरूणांना वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे महत्त्व पटवून देणार आहे. मागील ६० वर्षांपासून विदर्भ उपेक्षित राहिला असल्याचे मत विदर्भ गर्जनाच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले.
विदर्भ वेगळा व्हावा ही प्रमुख मागणी असली तरी विदर्भ गर्जनाच्यावतीने विदर्भातील जनतेची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगती व्हावी याकरीता प्रयत्न करणार आहे, त्यासाठी कार्यकर्ता मेळावे, युवकांचे प्रशिक्षण शिबिरे, अभ्यास वर्ग आगामी काळात घेणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता सर्वस्तरावरील लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन त्यांचे समर्थन घेण्यात येणार आहे. हे अभियान पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. खासदार मधुकर कुकडे व माजी खासदार नाना पाटोले हे विदर्भ समर्थक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विदर्भाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या पक्षांनी विदर्भाच्या मागणीचे समर्थन करावे, अशी मागणी विदर्भ गर्जनाच्यावतीने करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकºयांना कर्जमाफीचा दिलासा मिळणार आहे, असा धिंडोरा पिटला. परंतु परिस्थिती समाधानकारक नाही. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा शेतकरी हिताकरिता विदर्भ गर्जना रस्त्यावर उतरेल असा इशारा महेंद्र निंबार्ते यांनी दिला.
स्थानिक समस्यांना घेऊन विदर्भ गर्जना ‘समस्यांचे समाधान’ या अभियानांतर्गत लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन स्थानिक समस्या सोडविण्यात येतील त्याकरिता आंदोलनही करण्यात येईल. महाविद्यालयीन तरुणांना यात सहभागी करून घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला महेंद्र निंबार्ते, राकेश भास्कर, राजहंस मस्के, संतोष लांजेवार, अंकित बांते, अमित टिचकुले, पवनकुमार लाडे, कार्तिक डेकाटे, मिलिंद मेश्राम, श्रेयश टेंभूरकर, पंकज राऊत, संजय टिचकुले, राहुल मेश्राम, रजत गणवीर, राकेश लोथे, पंकज लाडे, अमित राऊत, कुलदीप शहारे, प्रशांत मेश्राम, निहार बुलबुले उपस्थित होते.