Video : आंधळगाव येथे प्रजासत्ताक दिनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, असं आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:13 PM2021-01-26T12:13:39+5:302021-01-26T12:15:13+5:30
किरण सातपुते असे या पाण्याच्या टाकीवर चढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ग्रामपंचायतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली होती. यावरून चौकशी करण्यात आली. त्यात...
भंडारा : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील ग्रामपंचायतीत झालेल्या गैरप्रकारात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत एका व्यक्तीने प्रजासत्ताक दिनीच शोलेस्टाईल आंदोलन सुरू केले आहे. संबंधित व्यक्ती गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा इशार देत आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून त्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
किरण सातपुते असे या पाण्याच्या टाकीवर चढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ग्रामपंचायतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली होती. यावरून चौकशी करण्यात आली. त्यात दोषी आढळलेल्यांकडून केवळ वसुली करण्यात आली. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, असे किरण सातपुते यांचे म्हणणे आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनी मंगळवारी पहाटे ५ वाजता ते अचानक गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीवर चढले. हा प्रकार काही वेळातच गावात माहित झाला. यानंतर ध्वजारोहनाच्या तयारीत असलेल्या गावकऱ्यांनी टाकीकडे धाव घेतली आणि त्यांनी किरण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कारवाईच्या मागणीवर अडून आहे. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. वृत्तलिहेपर्यंत किरण हे पाण्याच्या टाकिवरच आहेत. त्यांची समजूत काढण्याचे काम सुरू आहे.
ग्रामपंचायतीतील गैरप्रकार प्रकरण; आंधळगाव येथे प्रजासत्ताक दिनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन#bhandarapic.twitter.com/7E7AQqderv
— Lokmat (@MiLOKMAT) January 26, 2021