रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी विधानसभा अध्यक्षांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:00 AM2020-01-15T06:00:00+5:302020-01-15T06:00:18+5:30
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांचा थांबा नाही. याबाबत समितीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे रेटा धरला. मात्र त्यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच रेल्वे बोर्डही या मागणीकडे सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे रेल्वे यात्री सेवा समितीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गत महिन्यात नागपूर-सिकंदराबाद या रेल्वे गाडीला रायपूरपर्यंत विस्तारित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलद गती गाड्यांचा थांबा देण्यात यावा या मागणीला घेऊन भंडारा जिल्हा रेल यात्री सेवा समितीतर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले. याबाबत कारवाई करण्याचे आश्वासनही पटोले यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जलदगती गाड्यांचा थांबा नाही. याबाबत समितीने वारंवार लोकप्रतिनिधींकडे रेटा धरला. मात्र त्यांचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच रेल्वे बोर्डही या मागणीकडे सावत्रपणाची वागणूक देत असल्याचे रेल्वे यात्री सेवा समितीचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे गत महिन्यात नागपूर-सिकंदराबाद या रेल्वे गाडीला रायपूरपर्यंत विस्तारित करण्यात आले. यात रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, अजनी, वरोरा, चंद्रपूर या ठिकाणी थांबे देण्यात आले. मात्र भंडारा रोड रेल्वे स्थानकाला थांब्यांमधून वगळण्यात आले.
लोकप्रतिनिधी मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. समितीच्या मागणीवरून नागपूर विभागीय व्यवस्थापकांनी बिलासपूर-पुणे या गाडीच्या थांब्यासाठी बिलासपूर संभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. परंतु वर्षभराचा कालावधी लोटूनही कारवाई झालेली नाही. परिणामी या रेल्वेगाडीचा थांबाही देण्यात आला नाही. दरम्यान या मागणीला घेऊन रेल्वे समितीचे सचिव रमेश सुपारे, सुरेश फुलसुंगे यासह अन्य पदाधिकाºयांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना सदर निवेदन सादर केले.
अन्य गाड्यांसाठीही रेटा
रेल्वे यात्री समितीने यापूर्वी ज्ञानेश्वरी, हावडा-कुर्ला-पुरी-शिर्डी या गाड्यांचे थांबे मिळावे व सेवाग्राम एक्सप्रेस गोंदियापर्यंत विस्तारित करण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच लोकप्रतिनिधींसह रेल्वे बोर्ड व अधिकाºयांना निवेदन दिले. परंतु राजकीय इच्छाशक्ती या कामी कमी पडली. याबाबतही कुठलीच भूमिका घेण्यात आली नाही. मात्र या गाड्यांच्या थांब्यासाठी रेलयात्री सेवा समितीने रेटा धरला आहे.