विद्यादानाचे हात सरसावले कोविड रुग्णांच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:33+5:302021-05-19T04:36:33+5:30
भंडारा जिल्ह्यात सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यादृष्टीने सुविधा कमी पडत आहेत. रुग्णांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी मदत ...
भंडारा जिल्ह्यात सध्या कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यादृष्टीने सुविधा कमी पडत आहेत. रुग्णांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी मदत करीत असतानाही ही मदत तोकडी पडत आहे. तेव्हा कोविड रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे. वाढत्या कोविड प्रादुर्भावाने अनेकांचा मृत्यू होत आहे. अनेक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी लाखनी तालुक्यातील विद्यादानाचे कार्य करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या साद माणुसकीची समूह, लाखनी व इतर सहृदयी शिक्षकांनी पुढाकार घेतला. कोविडच्या संकटकाळात रुग्णांना मदत करण्याबाबत समूह सदस्यांनी समूहात चर्चा केली व या रुग्णांना मदत करण्याचे ठरवले. अवघ्या दोन दिवसांत अडीच लाखांपेक्षा जास्त निधी समूह सदस्यांनी व इतर सहृदयी शिक्षकांनी संकलित केला. काही मोजक्या समूह प्रतिनिधींनी तहसीलदार व गटविकास अधिकारी, लाखनी यांची संयुक्त भेट घेऊन तालुक्यातील कोविड रुग्णांच्या समस्या व त्यांना नितांत गरज असलेल्या वस्तू व साहित्याबाबत चर्चा केली. त्यानुसार कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी वॉशिंग मशीन, ॲटोमॅटिक सॅनिटायझर ड्रॉप मशीन, हॉट अँड कोल्ड वाटर मशीन, इंडक्शन मशीन, स्टील केटल, इमर्जन्सी लाइट्स, सॅनिटायझर, चादर, ब्लिचिंग पावडर, हँडवॉश बॉटल्स, वॉशिंग पावडर, फिनाईल, टॉयलेट क्लीनर, बकेट्स तसेच रुग्णांसाठी कीट तयार करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक साहित्याची पॅकिंग करून देण्यात आली. तसेच इतरही अत्यावश्यक साहित्य संकलित निधीतून रुग्णांसाठी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. साहित्य सुपूर्द कार्यक्रमप्रसंगी नायब तहसीलदार दोनोडे उपस्थित होत्या. तसेच समूहातील प्रमोद हटेवार, श्रीधर काकीरवार, राम चाचेरे, चंद्रशेखर गिऱ्हेपुंजे, रवींद्र म्हस्के, निशिकांत बडवाईक, ज्ञानेश्वर लांडगे, सतीश वासनिक, प्रमोद खेडीकर, लालबहादूर काळबांधे, संतोष सिंगनजुडे, चेतन भुळे, योगीराज देशपांडे उपस्थित होते.
कोट
आपले सामाजिक दायित्व ओळखून या कठीण काळात या समूहातील सदस्यांनी व इतर सहृदयी शिक्षकांनी हिरीरीने निधी संकलित करत कोविड रुग्णांना सर्वतोपरी प्रत्यक्ष मदत केली, हे स्तुत्य व अभिमानास्पद कार्य आहे.
मल्लिक विराणी, तहसीलदार, लाखनी
कोट
समूहातील सदस्यांनी व इतर सहृदयी शिक्षकांनी एकत्रित येत कोविड रुग्णांना जो मदतीचा हात दिला, तो कौतुकास्पद आहे. आपणही समाजातील एक घटक असून, गरजूंना मदत करण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
डॉ. शेखर जाधव, गटविकास अधिकारी, लाखनी
कोट
ज्ञानदानाचे कार्य करत असताना आम्हीही या समाजाचे घटक असून, आपली नैतिक जबाबदारी व सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून आम्ही एकत्रित आलो व सर्वजण सोबतीने सामाजिक कार्य करत आहोत.
पुरुषोत्तम झोडे, समूहप्रमुख, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक