लसीकरणासाठी सरसावले गावपुढारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:00 AM2021-12-26T05:00:00+5:302021-12-26T05:00:26+5:30
राज्यातील पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती उत्तम आहे. मात्र, आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या भागात लसीकरणाचे प्रमाण नगण्य होते. मे महिन्यात आलेसूर येथे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने शिबिर लावून लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले. तरी कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व तुमसर तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले. प्रथम गावपुढाऱ्यांना लसीकरणाची इत्थंभूत माहिती देत लसीकरणाबाबतचे गैरसमज नागरिकांमधून दूर करण्याचे आवाहन केले.
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सलस घेतली की माणूस मरतो, किंबहुना अपत्यही होत नाही, अशी शंभर टक्के अफवा पसरलेल्या आदिवासीबहुल गावांत गावपुढाऱ्यांनी एकोपा दाखवित लसीकरणाच्या बाबतीत जनजागृतीच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली. तुमसर तालुक्यातील शंभर टक्के आदिवासीबहुल गाव असलेल्या आलेसूर येथील गावपुढाऱ्यांसह ग्रामस्थांची सकारात्मक भूमिका काय साध्य करू शकते, ही बाब कोरोना लसीकरणाच्या माध्यमातून दाखवून दिले. गावात ९८ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, दुसऱ्या डोसच्या जनजागृतीसाठीही सर्वच सज्ज झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या हाकेला ग्रामस्थांचे लाभलेले सहकार्य अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.
राज्यातील पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती उत्तम आहे. मात्र, आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या भागात लसीकरणाचे प्रमाण नगण्य होते. मे महिन्यात आलेसूर येथे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने शिबिर लावून लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले. तरी कुणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व तुमसर तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले. प्रथम गावपुढाऱ्यांना लसीकरणाची इत्थंभूत माहिती देत लसीकरणाबाबतचे गैरसमज नागरिकांमधून दूर करण्याचे आवाहन केले. गावपुढाऱ्यांनी एकमताने आश्वासन देत सहकार्य केले.
यात गावातील एकूण पात्र लाभार्थींपैकी १८ वयोवर्षावरील २४ डिसेंबरपर्यंत १४५० नागरिकांनी पहिला डोस तर १३३१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ९८ टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणासाठी तुमसरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, गटविकास अधिकारी धीरज पाटील, आलेसूरचे सरपंच अंतकला श्याम राऊत, उपसरपंच रामचंद्र करमकर, ग्रामपंचायत सदस्य युवराज सोनवाने, सुनील नरकंडे, मनोहर मरसकोल्हे, आशाताई वाघाडे, नेहा धुर्वे, कविता भोयर, जीवनज्योती कोरचे, प्रतीभा धुर्वे, विसराम धुर्वे, आशावर्कर रेखा कोरडे, सिंधू लोखंडे, शिक्षक राठोड, शेंडे, कापगते, उमेद कार्यकर्ता अरिवंद खेडकर, तलाठी एम.एन. कारेमाेरे यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, या बाबीची स्वत: जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दखल घेत गावपुढाऱ्यांची पाठ थोपटली व नागरिकांचे कौतुक केले.
आधी स्वत: घेतली लस
- आरोग्य विभागाच्या आवाहनानंतर प्रथम येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वत: लस घेतली. सरपंच ते सर्व सदस्य यात सहभागी झाले. गावात फिरून त्यांनी ‘आम्हाला बघा, काहीच झाले नाही. लस घेतल्याने कुठलाही दुष्परिणाम होत नाही’, अशी जनजागृती केली. पोस्टर काढून ठिकठिकाणी गावात लावले. घरोघरी जाऊन नागरिकांचे मत परिवर्तन करण्यात आले. या प्रयत्नाने आज आलेसूरची शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल सुरू आहे.