करचखेडा बेटावर गावठी दारू कारखाना उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:34 AM2021-05-17T04:34:03+5:302021-05-17T04:34:03+5:30
भंडारा : वैनगंगा नदीच्या पात्रातील करचखेडा बेटावर गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या गावठी दारू कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ...
भंडारा : वैनगंगा नदीच्या पात्रातील करचखेडा बेटावर गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या गावठी दारू कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी धाड टाकली. या ठिकाणी अडीच क्विंटल मोहा सडव्यासह ५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांना पाहताच दारू गाळणारे तेथून पसार झाले. याप्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जात आहे. संचारबंदीच्या काळात दारू गाळण्याला उधाण आले होते. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी कारधाचे ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या सोबत करचखेडा बेटावर धाड मारली. दारू गाळण्याचे दृश्य पाहून पोलीसह अचंबित झाले. एखाद्या मोठ्या कारखान्यासारखे दृश्य तेथे होते. मोहमाची भट्टी लावण्यासाठी १० लोखंडी ड्रम, जमिनीत गाळून ठेवलेले २०० मातीचे मडके आणि १०० प्लास्टिक पिशव्यांमध्ये अडीच क्विंटल मोह सडवा आढळून आला.
पोलिसांनी धाड टाकताच दारू गाळणारे सर्व तेथून पसार झाले. पोलिसांनी याप्रकरणी नंदा गणेश भुरे (३५), सतीबाई विष्णू केवट (४०), वनिता उत्तम केवट (३२), विनोद तुकाराम खंगार (३५), निखिल किशन मेश्राम (३५), प्रकाश जगन वलथरे (३५), चैताराम तुकाराम मडामे (५५) सर्व रा. करचखेडा, ता. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे प्रमुख जयवंत चव्हाण, सहायक पोलीस अधीक्षक दीपक वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, हवालदार तुळशीदास मोहरकर, विवेक रणदिवे, कैलाश पडोळे, क्रिष्णा बोरकर, संदीप भानारकर, अमोल वाघ, प्रवीण खाडे, प्रवीण जाधव यांनी केली.
बाॅक्स
सर्वाधिक हातभट्ट्या कारधा ठाण्याच्या हद्दीत
भंडारा शहरालगत असलेल्या कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक हातभट्ट्या सुरू असल्याचे दिसून येते. वैनगंगा नदीच्या पात्रात निर्माण झालेल्या बेटावर मोठ्या प्रमाणात दारू गाळली जाते. हा प्रकार सर्वसामान्यांना माहीत आहे; परंतु कारधा पोलीस कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. शनिवारीसुद्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढाकार घेऊन करचखेडा बेटावर धाड टाकली.