गाव पांजरा, लिहिले पिपरी
By admin | Published: June 17, 2017 12:24 AM2017-06-17T00:24:16+5:302017-06-17T00:24:16+5:30
गावाचे नाव पांजरा रेंगेपार परंतु गावाबाहेर रस्त्याशेजारील दगडावर पिपरी गावाची नोंद करण्यात आली.
वरातीला बसला फटका : सार्वजनिक बांधकाम विभागाने गावाचे नाव बदलविले
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गावाचे नाव पांजरा रेंगेपार परंतु गावाबाहेर रस्त्याशेजारील दगडावर पिपरी गावाची नोंद करण्यात आली. नियोजनाच्या अभावी बाहेरून येणाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित विभाग येथे कुंभकर्णी झोपेत दिसत आहे.
तुमसरपासून १८ कि़मी. अंतरावर पांजरा रेंगेपार हे गाव आहे. गावाला जाणाऱ्या रस्त्याशेजारी दगडावर पांजरा ऐवजी पिपरी गावाचे नाव लिहिण्यात आले. या घटनेला एका महिन्यापासून जास्त दिवस लोटले, परंतु संबंधित विभागाच्या लक्षात आले नाही. दहा दिवसापूर्वी पिपरी येथे लग्नाची वरात जात होती. वरात पिपरी गावाचे नाव पाहून पांजऱ्यात थांबले नंतर त्यांना हे गाव नसल्याचे कळले.
पांजरा गावापासून पिपरीचे अंतर सुमारे १२ कि़मी. इतके आहे. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची मालकी आहे. या रस्त्यावर दगड लावून त्यावर गावाचे नाव लिहिण्यात आले, परंतु दगडावर रंगरंगोटी करताना निदान कोणते गाव आहे याची चौकशी करण्याची गरज होती.
दगडावर नाव लिहिलेल्या स्थळापासून हाकेच्या अंतरावर पांजरा येथील घरे आहेत. किमान त्यांना विचारण्याची गरज होती. रस्त्यावरील दगडावर नाव लिहिल्यानंतर किमान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी निश्चितच तपासणी केली असणार त्यांनी चौकशी केली होती काय, हा संशोधनाचा विषय आहे. चूक झाल्यावरही किमान ती दुरूस्ती करण्याचे योजना अजुनपर्यंत दाखविण्यात आले नाही. नियमावर बोट ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे तालुक्यातील कामे कशी असतील त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथे दुर्लक्ष दिसत असून केवळ कागदोपत्री कामे येथे सुुरू आहेत. गाव पांजरा नाव लिहीले पिपरी यावरून कामांचा दर्जा येथे दिसून येतो.
-हिरालाल नागपूरे, गटनेते पं.स. तुमसर.
पांजरा ऐवजी पिपरी असे चुकीने झाले असेल, तात्काळ ते नाव बदलविण्यात येईल. अनावधानाने असा प्रकार घडला असेल.
-विलास घोगले, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, तुमसर.