पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडीतने ग्रामस्थांमध्ये रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:48+5:302021-09-07T04:42:48+5:30
भंडारा : महावितरण कंपनीचे वीज बिल थकीत असल्यामुळे येथील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने महिनापासून गावांमध्ये रात्रीच्या वेळेस ...
भंडारा : महावितरण कंपनीचे वीज बिल थकीत असल्यामुळे येथील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने महिनापासून गावांमध्ये रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पथदिव्यांच्या विजेचे बिल भरण्याकरिता जिल्हा परिषद ग्रामपंचायतीकडे बोट दाखवीत असल्याने खुटसावरी परिसरातील ग्रामपंचायत अडचणीत आली आहे.
भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथील ग्रामपंचायत परिसरामधून नावाजलेली ग्रामपंचायत आहे. कोरोना विषाणूच्या महामारीने ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. विकासाच्या कामांना ब्रेक लागला आहे. अशातच विद्युत वितरण कंपनीने ग्रामपंचायतीला थकीत पथदिव्यांचे बिल भरणा करण्यासंबंधी नोटीस बजावून पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पथदिव्यांच्या बिलासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून जिल्हा परिषदेकडे वर्ग करीत असे. या प्राप्त झालेल्या निधीतून जिल्हा परिषद पथदिव्यांच्या बिलाचा भरणा करण्याची प्रचलित पद्धत सुरू होती; परंतु आता सदर पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा करण्यासाठी जिल्हा परिषदेने हात झटकल्यामुळे बिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आली आहे. कोरोना विषाणूच्या महामारीने गावातील विकासकामे प्रभावित झाली आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधीतून पथदिव्यांच्या विजेचा बिल भरणा करावा, असे सांगून जिल्हा परिषदेने आपले हात झटकले आहेत; परंतु या निधीचा विनियोग करण्यासाठी एक वर्षापासून नियोजन करून शासनाच्या मंजुरीकरिता पाठविण्यात आले आहे. त्या मंजुरी प्रस्तावात पथदिव्यांच्या विद्युत बिलाचा समावेश नाही. शासनाने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी गाव विकासासाठी ठेवून पथदिव्यांच्या विजेचा बिल भरण्यासाठी स्वतंत्र निधी द्यावा, अशी मागणी खुटसावरीचे सरपंच मनीषा वासनिक, उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्याेती नंदेश्वर, प्रियंका सार्वे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
ग्रामस्थांमध्ये अपघाताचा धोका बळावला
पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. अशातच वीज बिल थकीतचे कारण पुढे करून महावितरणने वीज पुरवठा खंडित केला. परिणामी रात्रीला अंधार असतो. त्या अंधारातून सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. अंधारामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. अशात शासनाने ग्रामपंचायतीचा वीज देयकाचा भरणा करून ग्रामस्थांना दिलासा देण्याची गरज आहे. एकीकडे शासन गावविकासाच्या बाता करीत असले तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास देत असल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
महावितरण कंपनीने खुटसावरी परिसरातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला असून, कोरोना संकटामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. ग्रामपंचायतीला एवढ्या थकीत रकमेचे विद्युत बिल भरणे शक्य नाही. जिल्हा परिषदेने या विद्युत बिलाचा भरणा करण्याची गरज आहे.
-भागवत मस्के, सामाजिक कार्यकर्ता