ग्रामस्थांनी अडविला महामंडळाचा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:37 PM2018-04-06T23:37:31+5:302018-04-06T23:37:31+5:30

The villagers blocked the tractor of the corporation | ग्रामस्थांनी अडविला महामंडळाचा ट्रॅक्टर

ग्रामस्थांनी अडविला महामंडळाचा ट्रॅक्टर

Next

लेखी आश्वासनानंतर सोडले : जंगलाच्या विकासाऐवजी होतोय ऱ्हास, ग्रामस्थांचा आरोप
विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : अड्याळ परिसराला लागून असलेल्या वनविकास महामंडळ अखत्यारीतील शेकडो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. हा जंगलाच्या विकासाऐवजी ऱ्हास आहे, असा आरोप करीत संतापलेल्या तिर्रीवासीयांनी गुरूवारी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर वनविकास महामंडळाच्या लहानमोठ्या लाकडांनी भरलेले तीन ट्रॅक्टर अडविले.
याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ ग्रामपंचायतीमध्ये बोलावुन विशेष आमसभा भरविण्यात आली. या सभेतच शेकडो ग्रामस्थांच्या समक्ष डी.एस. इंगळे तथा वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत (लाखनी), बि. एल. राऊत या तिन्ही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांवर लिखित आश्वासन दिले.
अड्याळ जवळील तिर्री माडगी, पुरकाबोडी, किटाळी, भिमसेन टेकडी परिसरातील हजारो हेक्टरमध्ये घनदाट जंगल होते. वनविकास महामंडळाने मागील तीन ते चार वर्षापासुन येथील शेकडो प्रकारच्या लहान मोठ्या झाडांची सर्रास कत्तल केली. याचा दुष्पपरिणाम म्हणजे वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे त्यांची वाटचाल आता जंगल शेजारील गावात पाहायला मिळते. तिर्री ग्रामवासीयांनी लोकप्रतिनिधी तथा वनमंत्री व संबंधित विभागाला गेली दोन वर्षात अनेक पत्रे दिली. परंतु या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आलीे. पवनी तालुक्यातील सर्वात शेवटच्या टोकावर असणारे गाव म्हणजे तिर्री. ग्रामस्थांनी अनेकदा या आधीही अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आणली आहेत. वनविकास महामंडळ हे खरच जंगलाचा विकास करत आहेत की ऱ्हास? असा प्रश्न नागरिकच विचारीत आहे. वनविकास महामंडळाची जिथे जिथे वृक्षतोड केली तिथे तिथे आजपावेतो सर्वात जास्त प्रमाणात सागवन वृक्ष लावण्यात आली. परंतू वृक्ष तोडमुळे उन्हाच्या दिवसात सावली मिळत नाही. पक्षांना खाद्य मिळत नाही. याच मनमानी कारभारामुळे व काही अधिकाऱ्यांच्या हेकेखोरवृत्तीला तिर्री ग्रामवासीयांनी चांगलाच धडा शिकविला.
तोडलेल्या २० हेक्टर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येईल तेव्हा तिर्री ग्रामवासी श्रमदान करतील. परंतु या ठिकाणी केवळ सागवण वृक्ष लावण्यात आले तर लावलेले वृक्षही ग्रामस्थच काढणार, असे मत ज्यावेळी माजी उपसरपंच सुरेंद्र आयतुलवार यांनी मांडले. त्यावेळी सभेत उपस्थित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मिश्र रोपवन लावण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. परंतु वेळेवर वनविकास महामंडळाने लक्ष दिले नाही.
‘मॅडम’ मराठीत बोला
आमसभेत चर्चेच्या वेळी वनपरिक्षेत्राधिकारी डि.बी. राऊत या इंग्रजीत बोलत होत्या. ग्रामस्थांना इंग्रजीे समजत नसल्याने येथे उपस्थित एका बालकाने ‘मॅडम’ मराठीत बोला, असे म्हणताच एकच हशा पिकला.

Web Title: The villagers blocked the tractor of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.