पोहरा गावात अज्ञाताची दहशत; गावकऱ्यांची उडाली झोप, रात्रभर द्यावा लागतोय जागता पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 01:46 PM2022-04-13T13:46:26+5:302022-04-13T14:03:12+5:30
काही दिवसांपूर्वी गावात आलेल्या एका पाहुण्याला गावकऱ्यांनी संशयावरून चांगलाच प्रसाद दिला होता.
सुरभी शिरपूरकर
भंडारा : जिल्ह्यातील पोहरा हे गाव सध्या चर्चेत आहे. दिवसभर काम करून या गावचे लोक रात्रभर जागरण करत आहे. कारणही तसंच आहे. एका अज्ञात व्यक्तीनं या गावकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत.
पोहरा गावात मागील २५ दिवसांपासून एका अज्ञात व्यक्तीची दहशत पसरली आहे. यामुळे, नागरिक रात्रभर लाट्या- काठया घेऊन पहारा देतात. हा अज्ञात व्यक्ती रात्री गावात येऊन महिलांची छेड काढतो, पाठलाग करतो. पुरुषांनाही त्रास देतो, अन् गायब होतो असा गावकऱ्यांचा दावा आहे. गेल्या २५ दिवसांपासून गावात हा प्रकार सुरू असून यामुळे ग्रामस्थ दहशतीत आहेत. याचा परिणाम म्हणून गावात रात्री बेरात्री येणाऱ्या व्यक्तीकडे गावकरी संशयानं पाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी गावात आलेल्या एका पाहुण्याला गावकऱ्यांनी संशयावरून चांगलाच प्रसाद दिला होता.
या संपुर्ण प्रकरणावरून गावात उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दंतकथा रंगवल्या जात आहेत. अज्ञात व्यक्ती चोर की भूत यावरून विविध चर्चांना उधाण आले आहे, गोष्टी रंगवल्या जात आहेत. सुरुवातीला कोणीतरी खोडकर व्यक्ती मस्करी करत असल्याचा भास ग्रामस्थांना झाला. मात्र, हा प्रकार दिवसेंदिवस होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गावात गस्तही दिली परंतु, चोर काही हाती लागला नाही. या प्रकारामुळे ग्रामस्थांचे सायंकाळी बाहेर निघणेही बंद झाले आहे. तर दुसरीकडे हा एखादा मानसिक रोगी असावा जो गावात दहशत पसरवतोय, असे समिती सदस्य सांगत फिरत आहेत.