आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:51 AM2019-05-27T00:51:36+5:302019-05-27T00:52:21+5:30
तालुक्यातील पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारला रात्री ८ वाजतापासून ते १२ वाजतापर्यंत काही ग्रामस्थांनी धुमाकुळ घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्थानांतरणाची मागणी केली. या गदारोळात संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्यात. इमारतीच्या खिडक्यांचे तावदान, इमारतीमधील फर्निचर, कुलर आदी साहित्याचे तावदान, इमारतीमधील फर्निचर, कुलर आदी साहित्याची फेकाफेकी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारला रात्री ८ वाजतापासून ते १२ वाजतापर्यंत काही ग्रामस्थांनी धुमाकुळ घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्थानांतरणाची मागणी केली. या गदारोळात संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्यात. इमारतीच्या खिडक्यांचे तावदान, इमारतीमधील फर्निचर, कुलर आदी साहित्याचे तावदान, इमारतीमधील फर्निचर, कुलर आदी साहित्याची फेकाफेकी केली. त्यामुळे पोहरा येथील वातावरण आरोग्य यंत्रणेविरुध्द विरुद्ध तापले होते.
याबाबत असे की, शनिवारला पोहरा येथील महिला रुग्ण कुरैशा फत्तू छव्वारे (५०) या सायंकाळी ४.३० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यात. त्यांचा रक्तदाब कमी झालेला होता व छातीत तीव्र वेदना होत होत्या. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना लाखनी येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले. छव्वारे जेव्हा रुग्णालयात आल्या होत्या तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.धम्मदीप बडोले रुग्णालयात नव्हते. ते किटाडी येथील मानव विकास कार्यक्रमात सहभागी झाले होते. डॉक्टर वेळेवर उपलब्ध राहत नसल्याचा रोष सायंकाळी पोहरावासीयांनी दवाखान्यावर काढला. रुग्णालयाला कुलूप लावण्यात आले. साहित्याची फेकाफेक करण्यात आली. वातावरण पेटल्यानंतर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
गटविकास अधिकारी धीरज पाटील, तहसीलदार मलीक विराणी, नायब तहसीलदार सोमनाथ माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हटनागर यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. डॉ.बडोले यांचे स्थानांतरण व्हावे यासाठी ग्रामपंचायतद्वारे निवेदन देण्यात आले. रात्री १२ वाजेपर्यंत लोकांचा जमाव रुग्णालयासमोर होता. जिल्हा आरोग्य विभाग आता कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष आहे.