विकासाची संकल्पना घेऊन गावांनी एकत्रित काम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:05 AM2021-02-18T05:05:27+5:302021-02-18T05:05:27+5:30
सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण १७ लोक ०४ के लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : तत्कालिन ग्रामविकास मंत्री आर. आर. (आबा) ...
सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण
१७ लोक ०४ के
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तत्कालिन ग्रामविकास मंत्री आर. आर. (आबा) पाटील यांनी ग्रामस्वच्छता, तंटामुक्तीसारख्या योजना राबवून गावांचा चेहरामोहरा आणि राज्याचे चित्रच बदलले. ही स्वच्छता चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी विकासाची संकल्पना घेऊन गावांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.
शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींवर देण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव’ पुरस्कारांचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझडे उपस्थित होते.
भंडारा तालुक्यातील गणेशपूर, मोहाडी मधील हरदोली, तुमसर-कर्कापूर, लाखनी-खराशी, साकोली-वडेगाव, लाखांदूर-जैतपूर व लाखनी तालुक्यातील बाम्हणी या ग्रामपंचायतींना सन २०१९-२०चा ‘स्मार्ट ग्राम पुरस्कार’ मिळाला आहे. या पुरस्कारांचे वितरण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत तालुका सुंदर गाव व जिल्हा सुंदर गाव पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना पारितोषिक प्राप्त रकमेतून नाविन्यपूर्ण कामे करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. यात प्रामुख्याने अपारंपरिक ऊर्जा संबंधित अभिनव प्रकल्प राबविणे, स्वच्छतेबाबत प्रकल्प, महिला सक्षमीकरण व मुलांना अनुकूल प्रकल्प, स्वच्छ पाणी प्रकल्प, भौगोलिक माहिती प्रणाली बसविणे (जीआयएस), दर्जा वाढविण्यासाठीचे प्रकल्प, ग्रामपंचायत हद्दीत सौर पथदिवे बसविणे, ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी कुंपण घालणे, स्मार्ट ग्राम योजनेत निवड झालेल्या ग्रामपंचायतीने इंटरनेट वायफाय सिस्टीम बसविणे, आदी कामांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक गटविकास अधिकारी टी. आर. बोरकर यांनी केले.