कोरोना काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकांना ९९ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:40+5:302021-06-23T04:23:40+5:30
भंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. मात्र आता नियमांत शिथिलता मिळाल्याने गेल्या ...
भंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. मात्र आता नियमांत शिथिलता मिळाल्याने गेल्या काही दिवसांत अनेकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने वाहतूक शाखेतर्फे वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. यात सर्वाधिक सीटबेल्ट न लावलेल्या चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. सीट बेल्ट न लावणाऱ्या चालकांना ०९ लाख १३ हजार दोनशे रुपयांचा दंड केला आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाने भीषण परिस्थिती निर्माण केली होती. अनेकांना रुग्णालयांत बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत होती. अनेकांना नागपूरला जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. यावेळी वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक संचारबंदसह, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते. अशातच वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये ट्रिपलसीट, विनापरवाना वाहन चालविणे, धोकादायक वाहन चालविणे, फॅन्सीनंबर प्लेट, विनालायसन्स, ओव्हरस्पीड, नो पार्किंग, विनाहेल्मेट अशा विविध कारणांमुळे त्यांच्यावर दंड आकारण्यात आला आहे. कोरोना संसर्ग कमी झाला असला तरीही वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे.
बॉक्स
ट्रिपलसीट जाणाऱ्या १९५५ जणांवर कारवाई
जिल्हा वाहतूक शाखेतर्फे ट्रिपलसीट प्रवास करणाऱ्या १०५५ जणांवर कारवाई करून तीन लाख ९१ हजार दंड आकारला आहे. तर विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या १७७३ जणांवर नो पार्किंग १३९५, मोबाइलवर बोलणारे २०५, तर विनानंबर प्लेट ३१५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
बॉक्स
ओवर स्पीडने जाणाऱ्या १३३० जणांना दंड
राष्ट्रीय महामार्गावरून वाहने भरधाव वेगाने धावतात. अशा वेळी वाहनधारकांना लक्षातही येत नाही. मात्र वाहतुकीचे नियंत्रण व्हावे, अपघात कमी व्हावे यासाठी ओव्हर स्पीडने वाहणे चालवणाऱ्या १३३० वाहनांवर कारवाई करून १३ लाख ३० हजार रुपये दंड आकारला आहे. या व्यतिरिक्त धोकादायक वाहन चालविणाऱ्या २१४ वाहनांवर दोन लाख १४ हजार रुपयांचा दंड आकारला आहे.
बॉक्स
कोरोना काळात ३६ हजार वाहनांवर कारवाई
भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असला तरी जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग व जिल्ह्याला लाभलेले नैसर्गिक वैभव यामुळे भंडारा जिल्ह्यातून नेहमीच वाहतुकीची वर्दळ सुरू असते. वेग नियंत्रित करून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे आतापर्यंत ३६ हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना घाबरत आहेत.