लोकप्रतिनिधी दौऱ्यावर, समस्या वाऱ्यावर
By admin | Published: November 11, 2016 12:49 AM2016-11-11T00:49:40+5:302016-11-11T00:49:40+5:30
विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य, पंचायत समिती सभापतीचे भाग्यच उजळले.
नगरसेवक, जि.प. सदस्य पर्यटनाकरिता रवाना : नगराध्यक्ष, मोजके नगरसेवक शहरात
सिराज शेख मोहाडी
विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य, पंचायत समिती सभापतीचे भाग्यच उजळले. मागील १५ ते २० दिवसापासून सर्वच पदाधिकारी पर्यटनासाठी गेले आहेत. कुणी नेपाळला तर कुणी केर, कर्नाटक, तामिलनाडू येथे परिवारासह भ्रमंती करीत आहेत.
मोहाडी नगर पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक भ्रमंतीवर असल्यामुळे नागरिकांना रहिवासी दाखला व अन्य कामांसाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील काही नगरसेवक सामान्य कुटुंबातील असून त्यांच्यासाठी तर विधान परिषद निवडणूक पर्वणी ठरली आहे. या निवडणुकीत एका मतदाराच्या मताला लाखोंचे मुल्य असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नगर पंचायत निवडणूक होऊन एका वर्षातच त्यांचे भाग्य झळकले आहे.
मात्र त्यांना ज्या सामान्य मतदारांनी निवडून दिले त्यांचे प्रश्न मात्र अजुनही तसेच आहेत. रस्ते दुरूस्ती, नाल्यांची स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी अशा समस्या कायम आहेत. परंतु नगरसेवकांच्या समस्या मात्र सुटणार आहेत. आता जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी हे नगरसेवक कामाला लागतील का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
येथील नगर पंचायत मुख्याधिकारी स्नेहा करपे यासुद्धा प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेलेल्या आहेत. त्या दोन दिवसानंतर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांअभावी मोहाडी नगरपंचायत पोरकी झाली आहे. बुधवारला तर मोहाडी नगरपंचायतीत एकही जबाबदार व्यक्ती हजर नव्हते. नगरसेवक दर्शनाला गेले असून मुख्याधिकारी प्रशिक्षणाला पुणे येथे असल्याने नागरीक वाऱ्यावर आहेत. ग्रामीण भागात दिवाळीनंतर मंडईचा जल्लोश असतो. विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना बोलावले जाते. मात्र लोकप्रतिनिधी दर्शनावर गेल्याने आयोजकांचा हिरमोड होत आहे. मोहाडीत चार पाच ठिकाणी मंडईचा कार्यक्रम होत असतो. मात्र नगरसेवक उपलब्ध नसल्याने आयोजकांपुढे उद्घाटनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. मुख्याधिकारी तसेच सर्वच्यासर्व नगर पंचायत सदस्य उपस्थित नसल्याने नगर पंचायत सध्या रामभरोसे आहे.