गोसेखुर्द धरणाला पर्यटकांच्या भेटी
By Admin | Published: February 1, 2015 10:52 PM2015-02-01T22:52:04+5:302015-02-01T22:52:04+5:30
पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाला यावर्षी जवळपास दोन लक्ष पर्यटकांनी आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. धरणामध्ये मोठ्या
गोसे (बुज.) : पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाला यावर्षी जवळपास दोन लक्ष पर्यटकांनी आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अजूनच खुलले आहे. धरणाचे ह सौंदर्य जवळून पाहून धरणाच्या आठवणी पर्यटक आपल्यासोबत नेत आहेत. रोजच मोठ्या संख्येने पर्यटक धरणाला भेट देत आहेत.
गोसेखुर्द धरणाच्या घाटउमरीच्या बाजुने असलेले घनदाट, विस्तीर्ण जंगल, उंच डोंगरदऱ्या, सभोवताल पसरलेले हिरवेगार रान, त्यातून खळखळ वाहणारा धरणाचा उजवा कालवा, त्या बाजुला पिवळी, हिरवी शेत हे मनमोहक दृश्य पाहून या धरणाला भेट देणाऱ्या पर्यटकांचे मन मोहून जाते. यावर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविला आहे. आतापर्यंतची सर्वात जास्त २४१ मीटर पाण्याची पातळी धरणामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे जिकडे पहावे तिकडे समुद्रासारखे अथांग पाणी धरणामध्ये दृष्टीस पडते.
या धरणाला परत भेट देण्याची इच्छा साऱ्यांनाच होत असल्यामुळे पर्यटकांची पाऊले धरणाकडे वळत असल्यामुळे दिवसें दिवस येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाटत आहे. धरणाजवळील जंगलाचा उमरेड-कऱ्हांडला-पवनी या नवीन अभयारण्यात समावेश करण्यात आल्यामुळे या अभयारण्यासोबतच गोसीखुर्द धरण हे चांगले पर्यटनस्थळ म्हणून येणाऱ्या दिवसात पुढे येणार आहे. (वार्ताहर)