दलित कवितेच्या विद्रोहाला विवेकाचे अधिष्ठान
By admin | Published: January 26, 2017 12:53 AM2017-01-26T00:53:24+5:302017-01-26T00:53:24+5:30
साठोत्तरी काळातील साहित्यात विलक्षण प्रभावी ठरलेल्या दलित कवितेतील विद्रोह हा केवळ विश्वंसक आणि बेदरकार प्रवृत्तीचा नसून त्याला गंभीर विवेकशीलतेचे अधिष्ठान होते,
अमृत बन्सोड : युगसंवादचा कवी आणि कविता उपक्रम
लाखनी : साठोत्तरी काळातील साहित्यात विलक्षण प्रभावी ठरलेल्या दलित कवितेतील विद्रोह हा केवळ विश्वंसक आणि बेदरकार प्रवृत्तीचा नसून त्याला गंभीर विवेकशीलतेचे अधिष्ठान होते, याचा प्रत्यय लाखनी येथील कवी सी.एम. बागडे यांच्या कवितेवरून येतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड यांनी कवी आणि कविता या उपक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा लाखनी, युगसंवाद वाड:मयीन आणि सांस्कृतिक संस्था भंडारा, मैफल लाखनी आणि ब्रोकनमेन सोशल मुव्हमेंट लाखनीच्या वतीने कवी आणि कविता या उपक्रमाचे आयोजन विवेकानंद वाचनालय लाखनी येथे करण्यात आले होते. निमंत्रित कवी म्हणून सी.एम. बागडे हे होते. कवी सी.एम. बागडे यांच्या अष्टदशकपूर्ती निमित्ताने त्यांचा शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मुरलीधर भांडारकर, विलास लाखनीचे अध्यक्ष ह.रा. मोहतुरे विचारमंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रमेश पवार यांनी सी.एम. बागडे यांच्या गझलेचे सुरेल गायन केले. कवी बागडे यांची प्रकट मुलाखत दिनेश पंचबुद्धे यांनी घेतले. आंबेडकरी प्रेरणेतून आणि स्वाभिमानी स्वभावामुळे आपण जीवनात यशस्वी झालो, असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर कवी सी.एम. बागडे यांनी त्यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन केले. त्यांच्या काव्यलेखनावर डॉ. धनंजय भिमटे आणि प्रा. संजय निंबेकर यांनी आस्वाद प्रतिक्रिया नोंदविल्या. कवी लखनसिंह कटरे यांनी उत्स्फूर्त मनोगत नोंदविले.
यावेळी प्रतिभा शहारे यांनी बागडे यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक प्रमोदकुमार अणेराव यांनी तर आभार ह.रा. मोहतुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)