घरूनच करा मतदान; वयोवृद्ध, दिव्यांगांसाठी आयोगातर्फे सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:25 AM2024-10-29T11:25:07+5:302024-10-29T11:26:19+5:30
'नमुना १२- ड' भरले का? : अधिसूचनेनंतर झाली नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी निर्वाचन आयोगाने गृह मतदानाची सोय केलेली आहे. निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर पाच दिवसांत नमुना १२-ड भरून गृह मतदानासाठी नोंद करावी लागते. त्यानुसार जिल्ह्याच्या तीन विधानसभा क्षेत्रात ८५ वर्षांवरील व दिव्यांग व्यक्तींनी मतदानासाठी नोंदणी केलेली आहे.
गृह मतदानासाठी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. निर्वाचन विभागातर्फे २२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर पाच दिवसांत गृह मतदानासाठी बीएलओंकडे नमुना १२- ड भरून नोंद करावी लागणार होती. वयाची ८५ वर्षे पूर्ण करणारे वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना घरूनच टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान करण्याची सोय आहे.
राबविली जाणार प्रक्रिया
निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांत गृह मतदा- नासाठी अर्ज करावा लागतो. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गृह मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आहे.
४० टक्क्यांपेक्षा दिव्यांगत्व गरजेचे
अपंगत्वाचे प्रमाण अधिक असलेले मतदार मतदान बूथपर्यंत जाऊ शकत नाहीत. तसेच ८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या वयोवृद्धांनाही मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी त्रास होतो. असे असले तरी दिव्यांगांसाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्वाची अट आहे. ही अट पूर्ण करणाऱ्या दिव्यांग मतदारालाच गृह मतदानासाठी बीएलओकडे अर्ज करता येतो.
८४२२ वृद्ध मतदार
जिल्ह्यात तीनही मतदारसंघ मिळून ८५ वर्षांवरील एकूण ८ हजार ४२२ वृद्ध मतदार आहेत. यामध्ये ६ हजार १६१ पुरुष, तर ९ हजार ५४ ज्येष्ठ महिला मतदारांचा समावेश आहे, तर दिव्यांग मतदारांची संख्या ७४६८ इतकी आहे.