मतदार आल्यापावली परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 09:58 PM2018-05-29T21:58:35+5:302018-05-29T21:58:46+5:30
विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रथमच व्हीव्हीपॅट या मशिनीचा ईव्हीएमसोबत वापर करण्यात आला. मात्र याच मशिनमधील प्रिंट होत असलेले कागद संपल्याने ५ वाजतापासून मतदान थांबविण्यात आले. त्यामुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले. हा प्रकार भंडारा शहरातील पटेलपुरा वॉर्डातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील मतदान केंद्रात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रथमच व्हीव्हीपॅट या मशिनीचा ईव्हीएमसोबत वापर करण्यात आला. मात्र याच मशिनमधील प्रिंट होत असलेले कागद संपल्याने ५ वाजतापासून मतदान थांबविण्यात आले. त्यामुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले. हा प्रकार भंडारा शहरातील पटेलपुरा वॉर्डातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील मतदान केंद्रात घडला.
मोठ्या बाजार परिसरात असलेल्या या मतदान केंद्रात दोन खोल्यांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. यात संत कबीर वॉर्ड, पटेलपुरा वॉर्ड, राममंदिर वॉर्ड यामधील मतदारांचा समावेश होता. केंद्र क्रमांक ९२ अंतर्गत व्हीव्हीपॅट मशीनमधील कामगदाचा रोल संपला. त्यामुळे जवळपास ५ वाजतापासून मतदान थांबविण्यात आले. दुसऱ्या खोलीतील मतदान मात्र सुरळीत सुरू होते. मात्र कागदाचा रोल संपल्यामुळे बहुतांश मतदारांना मतदान करता आले नाही. वॉर्डातील बहुतांश नागरिक उष्णता कमी झाल्यावर मतदानासाठी बाहेर पडले. यावेळी जवळपास ५० पेक्षा जास्त मतदारांची रांग तयार झाली होती. यात महिला मतदारांची संख्या अधिक होती. एक तास उलटल्यावरही व्हीव्हीपॅटमध्ये कागदाचा रोल घालण्यात आला नव्हता. परिणामी अनेक मतदार मतदान न करताच आल्यापावली परत गेले. याची माहिती उमेदवारांच्या प्रतिनिधींना मिळताच त्यांनी मतदान केंद्र गाठून अधिकाºयांना जाब विचारला. यात मतदान अधिकाऱ्यांना कुठलेही उत्तर देता आले नाही.
केंद्रावर उपस्थित माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अर्ज लिहून मतदान अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यावेळी नगरसेवक नितीन धकाते, मौसमसिंग ठाकूर, संजय बंसोड, ओमप्रकाश थानथराटे आदी उपस्थित होते. बराचवेळ थांबल्यानंतर मतदार तिथून निघून गेले.