मतदारांनो, निर्भयपणे मतदान करा

By admin | Published: November 11, 2016 12:48 AM2016-11-11T00:48:53+5:302016-11-11T00:48:53+5:30

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक १९ नोव्हेंबर रोजी होणार असून या निवडणूकीत पात्र मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता

Voters, vote frankly | मतदारांनो, निर्भयपणे मतदान करा

मतदारांनो, निर्भयपणे मतदान करा

Next

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक
भंडारा : भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक १९ नोव्हेंबर रोजी होणार असून या निवडणूकीत पात्र मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. या निवडणूकीत होणाऱ्या रोखीच्या व्यवहारावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार असून दोषी आढळल्यास सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असे संकेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. मतदानाची गुप्तता पाळण्यात येईल. आपले मत कोणाला गेले हे कोणालाही माहिती पडणार नाही, अशी व्यवस्था आहे. मतदाराचे मतदान व ओळख गोपणीय ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी निसंकोचपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
या निवडणूकीदरम्यान मतदारास प्रलोभन देण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र मतदारांनी कुठलेही मोठे रोख व्यवहार करु नयेत. मोठया रोख व्यवहाराच्या बँक खात्यावर आयकर विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. समोर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता असे व्यवहार कटाक्षाने टाळावे.
विधान परिषदेसाठी भंडारा- गोंदिया जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात आचारसंहिता लागू असून आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दोन्ही जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले असून तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात आले आहे. अवैध दारु विक्री व डेली स्टॉक नियंत्रीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोशल मिडीयावरील प्रचारावर पोलीस विभागाच्या सायबर सेलकडून नियंत्रण ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी सोशल मिडीयाचा जपून वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या ३९३ एवढी आहे. यात जिल्हा परिषद भंडारा ५९, नगर परिषद भंडारा ३५, नगर परिषद तुमसर २५ नगर परिषद पवनी १९, नगर पंचायत मोहाडी १९, नगर पंचायत लाखनी १९, नगर पंचायत लाखांदूर १९ असे भंडारा जिल्ह्यातील १९५ व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद गोंदिया ५९, नगर परिषद गोंदिया ४४, नगर परिषद तिरोडा १९, नगर पंचायत गोरेगांव १९, नगर पंचायत सडकअजुर्नी १९, नगर पंचायत देवरी १९, नगर पंचायत अजुर्नीमोरगाव १९ असे एकूण १९८ स्थानिक प्राधिकारी संस्थेचे सदस्य मतदार आहेत.
या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, मंडळ अधिकारी उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्हयात तहसिल कार्यालय सडक अजुर्नी खोली क्रमांक ८ व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया असे चार मतदान केंद्र आहेत. भंडारा- गोंदिया स्थानिक मतदार संघ निवडणुकीसाठी 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उपरोक्त मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येईल. मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून करण्यात येईल. मतपेटया ठेवण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात स्ट्राँगरुम निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Voters, vote frankly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.