जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:00 AM2019-10-23T06:00:00+5:302019-10-23T06:00:39+5:30
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील नऊ लाख ९१ हजार ८९० मतदारांपैकी सहा लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात तीन लाख ४४ हजार ३३४ पुरुष आणि तीन लाख २७ हजार ४८७ महिला मतदारांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती केल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत तिनही मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ६७.७३ टक्के मतदानाची नोंद झाली असून २०१४ च्या तुलनेत ३.२४ टक्के कमी मतदान झाले. जिल्ह्यात साकोली मतदारसंघात सर्वाधिक ७१.१६ तर सर्वात कमी भंडारा येथे ६२.५५ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात मोठा उत्साह दिसत असला तरी शहरी भागात निरुत्साह दिसून आला.
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील नऊ लाख ९१ हजार ८९० मतदारांपैकी सहा लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात तीन लाख ४४ हजार ३३४ पुरुष आणि तीन लाख २७ हजार ४८७ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुषांची मतदानाची टक्केवारी ६८.९६ तर महिलांची टक्केवारी ६६.४८ आहे.
तुमसर विधानसभा मतदारसंघात ७०.४६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तीन लाख दोन हजार ९२३ मतदानांपैकी दोन लाख १३ हजार ४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात एक लाख ९ हजार ६२३ पुरुष आणि एक लाख तीन हजार ८२२ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुषांची टक्केवारी ७१.५४ तर महिलांची टक्केवारी ६९.३६ आहे. भंडारा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वात कमी ६२.५५ टक्के मतदारांनी मतदाराचा हक्क बजावला. तीन लाख ७० हजार ५७४ मतदारांपैकी दोन लाख ३१ हजार ७९३ मतदारांनी मतदान केले. त्यात एक लाख २० हजार ४२ पुरुष आणि एक लाख ११ हजार ७५१ महिला मतदारांचा समावेश आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७१.१६ टक्के मतदानाची नोंद झाली. तीन लाख १८ हजार ३९३ मतदारांपैकी दोन लाख २६ हजार ५८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात एक लाख १४ हजार ६६९ पुरुष आणि एक लाख ११ हजार ९१४ महिला मतदारांचा समावेश आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा निवडणुकीचा टक्क घसरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ३.२४ टक्के मतदान गत वेळीच्या तुलनेत यंदा कमी झाले आहे. त्यात तुमसर ०.९८, भंडारा ५.६७ आणि साकोलीत २.५४ टक्के मतदान कमी नोंदविण्यात आले आहे. २०१४ च्या निवडणुकीत ७०.९७ टक्के मतदान झाले होते. नऊ लाख १७ हजार ६२२ मतदारांपैकी सहा लाख ९१ हजार २६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तुमसर विधानसभा क्षेत्रात ७१.४४, भंडारात ६८.२३ आणि साकोलीत ७३.७० टक्के मतदान नोंदविण्यात आले होते. यावेळी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांसह शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतरही शहरी भागात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून येत आहे.
६ लाख ७१ हजार ८२१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
साकोलीत सर्वाधिक तर भंडाऱ्यात सर्वात कमी
जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. ७१.१६ टक्के मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. तर भंडारा विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी म्हणजे ६२.५५ टक्के मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच मतदानाबाबत उत्साह दिसून येत होता. भंडारा शहरात मतदानाच्या शेवटच्या तासात पाऊस कोसळल्याने टक्केवारी घसरल्याचे सांगितले जाते. मात्र सकाळपासूनच भंडारा विधानसभा क्षेत्रात मतदानाची गती संथ होती. सकाळी ९ वाजेपर्यंत केवळ १.३० टक्के आणि शेवटच्या दोन तासात २.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष २४ ऑक्टोबर रोजी होणाºया मतमोजणीकडे लागले आहे. गावागावांत मतदानाचा टक्केवारीवरुन आकडेमोड करुन कोण विजयी होईल. याचे गणित लावले जात आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस बहुउद्देशिय सभागृहात तर तुमसर येथे आयटीआय ईमारतीत तर साकोली येथे तहसीलच्या नविन इमारतीत मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आली असून मतमोजणी कक्षाच्या परिसरात प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आला आहे. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत किंवा मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश लागु राहील.