तंटामुक्त अध्यक्षाची निवड केली मतदानाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:39 AM2019-09-10T00:39:18+5:302019-09-10T00:40:13+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली. मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी गावागावात आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी/मोठी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली. मात्र या अभियानाला राजकीय ग्रहण लागले असून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी गावागावात आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच प्रत्यय दिघोरीत येत असून मागील दोन वर्षापासून तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड ही मतदान प्रक्रियेद्वारे पार पडत आहे.
२७ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्षाची निवड करण्यासंबंधाने चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने ९ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम एक तृतीयांश सदस्याची फेरबदल करण्यात आली. यानंतर तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदासाठी आलेल्या अर्जापैकी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला. कुणीही अर्ज मागे न घेतल्याने तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी महादेव कांबळे, सुभाष हटवार, मंगेश करंजेकर, सिध्दार्थ लोणारे व वसंत हटवार हे उमेदवार निवडणुकीसाठी ग्राह्य धरणात आले. मतदानाद्वारे पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय कमेटी बनविण्यात आली. यामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून राहूल शिक्षण संस्थेचे सचिव मधुकर अंबादे यांनी काम पाहिले तर सरपंच अरुण गभणे, उपसरपंच रोहीदास देशमुख, पंचायत समिती सदस्य गुलाबराव कापसे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यामध्ये स्थान दण्ेयात आले.
ठिकठिकाणी चर्चेला उधाण
दिघोरीतील तंटामुक्त समितीच्या निवडणुकीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारख्या माहोल तयार झाला असून या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांनी मागील १५ दिवसापासून ओल्या पार्टीचे आयोजन केले. काही उमेदवारांनी नगदी स्वरुपात तर काहींनी घरगुती सामान सुध्दा मतदारांना वाटले असल्याचे दिसून आले.
महिलांना निंदणाची दुप्पट मजुरी
आज निवडणुकीच्या दिवशी धानाच्या निंदणासाठी मजुरीवर गेलेल्या महिलांना ट्रॅक्टर, जि.प. आणि चारचाकी वाहनाद्वारे दुप्पट मजुरीचे पैसे देवून आपल्या बाजूने मत घालण्यासाठी आणण्यात आले. सदर प्रसंग पाहुण लोकशाही कुठल्या थराला जावून पोहचली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची निवड ही तळीरामासाठी पर्वणीच ठरली.