38 जागांसाठी 18 जानेवारीला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 05:00 AM2021-12-18T05:00:00+5:302021-12-18T05:00:52+5:30
शुक्रवारी राज्य निवडणूक आयाेगाने स्थगीत केलेल्या ओबीसी प्रवर्गातील जागांची निवडणूक सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार निवडणूक कार्यक्रमही घाेषित करण्यात आला. आता १८ जानेवारी राेजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३८ जागांसाठी निवडणूक हाेणार आहे. या जागांसाठी सर्व प्रक्रिया नव्याने राबविली जाणार आहे. महिला प्रवर्गातील आरक्षण काढल्यानंतर निवडणुकीची अधिसूचना २९ डिसेंबर राेजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्थगित झालेली निवडणूक आता १८ जानेवारी राेजी हाेत आहे. जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांसाठी निवडणूक हाेत असून, सर्व जागांची एकत्रित मतमाेजणी १९ जानेवारी राेजी हाेणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयाेगाने शुक्रवारी आदेश जारी केला आहे. ओबीसी प्रवर्गातील जागांवर आता सर्वसाधारण गटासाठी निवडणूक हाेणार आहे. दाेन टप्प्यांत हाेणाऱ्या या निवडणुकीने यंत्रणेवर मात्र ताण वाढणार आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी निवडणूक घाेषित झाली हाेती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३, पंचायत समितीच्या २५ जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली हाेती. उर्वरित ३९ जिल्हा परिषदेच्या आणि ७९ पंचायत समितीच्या जागांसाठी २१ डिसेंबर राेजी मतदान घेण्यात येत आहे. निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात हाेती. दुसरीकडे अनिश्चिततेच्या वातावरणात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली.
शुक्रवारी राज्य निवडणूक आयाेगाने स्थगीत केलेल्या ओबीसी प्रवर्गातील जागांची निवडणूक सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यानुसार निवडणूक कार्यक्रमही घाेषित करण्यात आला. आता १८ जानेवारी राेजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ३८ जागांसाठी निवडणूक हाेणार आहे. या जागांसाठी सर्व प्रक्रिया नव्याने राबविली जाणार आहे. महिला प्रवर्गातील आरक्षण काढल्यानंतर निवडणुकीची अधिसूचना २९ डिसेंबर राेजी प्रसिद्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांची एकत्रित मतमाेजणी १९ जानेवारी राेजी हाेणार आहे.
या १३ गटात हाेणार निवडणूक
- भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ गटांसाठी १८ जानेवारी राेजी मतदान घेतले जाणार आहे. त्यात तुमसर तालुक्यातील चुल्हाड, सिहाेरा, गर्रा, माेहाडी तालुक्यातील कांद्री, डाेंगरगाव, वरठी, लाखंनी तालुक्यातील लाखाेरी, मुरमाडी सा., केसलवाडा वाघ, मुरमाडी तूप, भंडारा तालुक्यातील सिल्ली आणि पवनी तालुक्यातील ब्रह्मी व भुयार गटांचा समावेश आहे.
पंचायत समितीच्या २५ गणांची निवडणूक
- ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने स्थगित झालेल्या पंचायत समितीच्या २५ गणांची आता निवडणूक हाेत असून त्यात तुमसर तालुक्यातील साखळी, आंबागड, खापा, देव्हाडी, माडगी, माेहाडी तालुक्यातील पांचगाव, माेहगाव देवी, पालाेरा, साकाेली तालुक्यातील कुंभली, वडद, सानगडी, लाखनी तालुक्यातील सालेभाटा, केसलवाडा वाघरे किटाळी, भंडारा तालुक्यातील काेथुर्णा, धारगाव, खाेकरला, काेंढी, पहेला, पवनी तालुक्यातील चिचाळ, पिंपळगाव, काेदुर्ली आणि लाखांदूर तालुक्यातील मासळ, भागडी, पिंपळगाव काे या गणांचा समावेश आहे.
महिनाभर मतपेट्यांची सुरक्षा करावी लागेल
- जिल्ह्यात दाेन टप्प्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक हाेत असली तरी मतमाेजणी मात्र एकत्रित १९ जानेवारी राेजी हाेणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ३९ व पंचायत समितीच्या ७९ जागांवरील झालेल्या निवडणुकीच्या मतदान यंत्राची सुरक्षा तब्बल महिनाभर करावी लागणार आहे. यामुळे प्रशासनावर ताण वाढणार आहे.
निवडणूक कार्यक्रम
२३ डिसेंबर : सर्वसाधारण महिला प्रवर्गाची आरक्षण साेडत
२९ डिसेंबर : निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
३ जानेवारी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक
४ जानेवारी : उमेदवार उमेदवारी अर्जांची छाननी
७ जानेवारी : उमेदवारी अर्जांवर अपील
१० जानेवारी : अपील अर्जांवर सुनावणी
१० जानेवारी : उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस व चिन्हवाटप
१८ जानेवारी : ३८ जागांसाठी मतदान
१९ जानेवारी : सर्व जागांची एकत्रित मतमाेजणी