तई येथे काळ्या फिती लावून तरूणांनी केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:41 PM2018-05-30T22:41:15+5:302018-05-30T22:41:26+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. काही गावांमध्ये मतदानच झाले नाही. यात साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर तालुक्यातील तई (बुज), मुरमाडी, पारडी, घोडेझरी या गावांमध्ये बुधवारला फेरमतदान घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. काही गावांमध्ये मतदानच झाले नाही. यात साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर तालुक्यातील तई (बुज), मुरमाडी, पारडी, घोडेझरी या गावांमध्ये बुधवारला फेरमतदान घेण्यात आले आहे.
यावेळी तई (बुज) येथील मतदान केंद्रावर महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी व अध्यक्ष प्रियंक बोरकर यांच्या नेतृत्वात काळ्या फिती लावून मतदान करायला गेले होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी प्रियंक बोरकर यांना अटक करून पालांदूर पोलीस ठाण्यात नेले. तिथे काही वेळ थांबवून सोडण्यात आले.
सोमवारला झालेल्या मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशिन बंंद पडल्याने येथे मतदान होऊ शकले नाही. त्यामुळे गावातील तसेच पोटाची खळगी भरण्याकरीता बाहेरगावी गेलेल्या मतदारांना मतदानापासुन वंचित राहुन घरी परतावे लागले होते. त्यामुळे या चारही तई (बुज), मुरमाडी, घोडेझरी, पारडी या गावांमध्ये बुधवारला फेरमतदान घेण्यात आले.
दरम्यान, आज संतप्त महाराष्ट्र युवक शेतकरी संघटना तई शाखेच्या काही युवकांनी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरने मतदान करण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून मतदान करायला जात असता पोलिसांनी त्यांना अडविले.
या प्रकाराबाबत गावात काही काळ वातावरण तापले होते. मतदानावर बहिष्कार न टाकता केवळ ईव्हीएम मशिन हटवून बॅलेट पेपरने मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी निवडणूक आ़योगाच्या विरोधात निषेध केल्याचे या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.