तीन महिन्यांपासून शिक्षकाची वेतनासाठी भटकंती
By Admin | Published: August 17, 2016 12:19 AM2016-08-17T00:19:47+5:302016-08-17T00:19:47+5:30
देशाची भावी पिढी घडविणारे व शिक्षणासारखे पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकावरच कर्तव्य बजावित असतानाही
भंडारा : देशाची भावी पिढी घडविणारे व शिक्षणासारखे पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकावरच कर्तव्य बजावित असतानाही आता उपासमारीचे संकट ओढाविले आहे. तीन महिन्यापूर्वी प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या या शिक्षकाचे वेतन थांबल्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले असून शिक्षकाला हक्काच्या वेतनासाठी भटकंती करावी लागत आहे.
लाखनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनमाळा येथे सहाय्यक शिक्षक असलेल्या धनराज वाघाये या शिक्षकावर हा प्रसंग ओढावला आहे. वाघाये हे सोमनाळा येथे शिक्षक होते. दरम्यान शिक्षकांच्या बदलीसंदर्भात झालेल्या कार्यशाळेनंतर त्यांची बदली करण्यात आली. लाखनी पंचायत समितीतून त्यांना भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पचखेडीला पदस्थापनेवर बदली करण्यात आली. जूनमध्ये त्यांना मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी पचखेडीला रूजू होण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार ते कर्तव्यावर रूजू झाले. दरम्यान ठाणा जि.प. शाळेत शिक्षकांचे पद रिक्त असल्याने वाघाये यांना ठाणा येथे तात्पुरते रूजू होण्याचे आदेश भंडारा पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी एस.एच. तिडके यांनी दिले.
पदस्थापनेवर रूजू झाल्यानंतर तात्पुरत्या आदेशानंतर ठाण्याला रूजू होणारे वाघाये कर्तव्य बजावत असताना दरम्यान न्यायालयाने शिक्षकांच्या बदलीप्रक्रियेला स्थगनादेश दिले. त्यामुळे वाघाये हे ठाणा येथे कर्तव्य बजावत आहेत. मागील तीन महिन्यांपासून वाघाये हे शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ठाणा येथे कर्तव्य बजावत असतानाही शिक्षण विभागाने त्यांना वेतनापासून वंचित ठेवलेले आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. वेतन मिळावे यासाठी त्यांनी अनेकदा पंचायत समिती शिक्षण विभाग व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उंबरठे झिजविले आहे.
मात्र शिक्षण विभागाने त्यांची अद्यापही दखल घेतलेली नाही. वाघाये यांनी त्यांना वेतन मिळावे अशी मागणी केली असतानाही शिक्षण विभागाने त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिली आहेत. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)
गटशिक्षणाधिकारी तिडके अनभिज्ञ !
वाघाये यांना ठाणा येथे प्रतिनियुक्तीवर रूजू होण्याबाबत भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तिडके यांनी आदेश बजावले. त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी प्रस्तूत प्रतिनिधीने आज बुधवारला दुपारी ३.०१ वाजता त्यांना विचारणा केली असता सदर शिक्षकाची माहिती नाही. त्यामुळे त्यांची सविस्तर माहिती काढून सांगतो असे उत्तर दिले. सायंकाळी ५.१४, ५.१५, ५.२०, ६.२८ वाजता त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावरूनच शिक्षण विभाग व त्यांचे अधिकारी शिक्षकांप्रती किती आस्था दाखवितात हे दिसून आले.
पतसंस्था अध्यक्ष गायधने सरसावले
शिक्षक वाघाये यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यासाठी ते शिक्षण विभागात सतत संपर्कात आहेत. मात्र प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षकांच्या पतसंस्थेत कर्जासाठी अर्ज सादर केला. त्यांचे नियमित वेतन येत नसल्याने शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने यांनी त्यांच्या वेतनासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आज बुधवारला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, शिक्षण विभाग व वित्त विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाघाये यांचे रखडलेले वेतन त्वरीत द्यावे व त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केला.
पचखेडी येथे जिभकाटे नावाच्या दोन शिक्षिका आहेत. नाम साधर्म्यामुळे अडचण निर्माण झाली. दरम्यान न्यायालयाने बदली प्रकरणात स्थगिती दिली. यामुळे वाघाये यांचे प्रकरण शिक्षण आयुक्तांकडे गेले आहे. त्यावर लगेच तोडगा निघाल्यास त्यांचे वेतन देण्यात येईल.
- सुवर्णलता घोडेस्वार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
प्रगत शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करीत आहेत. शिक्षकांचे वेतन वेळेत देण्याची तरतूद शिक्षण विभागाने तातडीने करावी. शिक्षकांच्या वेतनाचा अन्याय खपवून घेणार नाही.
- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, म.रा. प्रा. शिक्षक संघ.