सुखद! चिंचोलीत बछड्यासह वाघिणीचे दर्शन; वनविभागाच्या अधिकाऱ्यासह वन्यप्रेमी सुखावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 05:00 AM2021-05-22T05:00:00+5:302021-05-22T11:20:25+5:30
नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांचे गस्ती पथक तयार करण्यात आले आहेत. पथक रात्रंदिवस गस्त घालीत असून वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
भंडारा : निसर्गाची मुक्त उधळण व सातपुडा पर्वत रांगातील घनदाट जंगलातील नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चिंचाेली परिसरात बछड्यासह वाघिणीचे दर्शन झाले. यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यासह वन्यप्रेमी सुखावले आहेत. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीचे दर्शन झाले. तुमसर ताुलुक्यातील नाकाडाेंगरी परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांसाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यात एक वाघिणी बछड्यासह ट्रॅप झाली. ही माहिती उपवनसंरक्षक एस. बी. भलावी यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेवरून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.
नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांचे गस्ती पथक तयार करण्यात आले आहेत. पथक रात्रंदिवस गस्त घालीत असून वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी शेजारील गावामध्ये जाऊन जनजागृती अभियान राबवित आहे. परिसरातील विहिरींना जाळी लावून बंद करण्यात आले. लाेकप्रतिनिधींनासुध्दा सूचना देण्यात आली आहे. या वाघिणीवर सनियंत्रण उपवनसंरक्षक एस.बी. भलावी यांच्या मार्गदर्शनात प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, वनपरिक्षक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय, वनपाल सुनील दिघाेरे, वनरक्षक लक्ष्मीकांत बाेरकर, तसेच इतर क्षेत्रीय कर्मचारी, हिरापूर संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि चिखलीच्या सरपंचांचे वनप्राणी व्यवस्थापनेत याेगदान आहे.
जंगलात एकटे जाण्यास मनाई
नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रात बछड्यासह वाघिणीचे दर्शन झाल्याने सायंकाळनंतर जंगलाच्या दिशेने एकटे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांना जंगलात मुक्त चराईसाठी मनाई करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गुराख्यानासुध्दा या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गावागावात वाघाबद्दल जनजागृतीही करण्यात येत आहे.
निसर्ग संपन्न भंडारा जिल्ह्यात वन्य जीवांचा मुक्त संचार सुरु आहे. चिंचाेली जंगलात पहिल्यांदाच वाघीण आणि बछड्यांचे दर्शन झाले. सुरक्षेसाठी विविध उपाय याेजन्यात आले असून परिसरातील विहिरींना जाळी लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. - एस. बी. भलावी, उपवनसंरक्षक, भंडारा