स्वयंरोजगार प्रेरणेसाठी वैनगंगा प्रदर्शनी व विक्री
By admin | Published: March 30, 2017 12:38 AM2017-03-30T00:38:50+5:302017-03-30T00:38:50+5:30
बचत गटाच्या महिलांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. याच प्रेरणेतून त्यांनी स्वयंसिध्द केले.
डीआरडीएचा पुढाकार : हाताने बनविलेले साहित्य खरेदीसाठी उमळली गर्दी
भंडारा : बचत गटाच्या महिलांना आत्मनिर्भर होता यावे यासाठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. याच प्रेरणेतून त्यांनी स्वयंसिध्द केले. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करताना बाजारपेठेचा अनुभव यावा यासाठी शिवाजी क्रीडा संकुलावर वैनगंगा प्रदर्शनी व विक्री सुरु करण्यात आली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील बचतगटांना त्यांनी तयार केलेल्या साहित्य विक्री करण्याचा अनुभव यावा हा या प्रदर्शनी मागचा मुळ उद्देश आहे.
२७ ते ३१ मार्चपर्यंत ही प्रदर्शनी व विक्री शिवाजी क्रीडा संकुलावर राहणार आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद अहिरे, प्रकल्प संचालक जगन्नाथ भोर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पाच दिवसीय या प्रदर्शनीत जिल्ह्यातील विविध गावांमधून ६४ बचत गटांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांनी तयार केलेले साहित्य या प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनीतूनच साहित्यांची विक्री करण्यात येत आहे.
प्रदर्शनीसाठी विस्तार अधिकारी अतुल वर्मा, किरण बनकर, सरोजनी खोब्रागडे, विनोद शेंडे, दिपक मडावी, तालुका गटसमन्वयक व बचत गटांच्या महिला व पुरुष सहकार्य करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
या साहित्यांची प्रदर्शनी
महिलांनी हातानी तयार केलेली एम्ब्रायडरी साडी, कापडी बॅग, अगरबत्ती, मेणबत्ती, बांबू चटई, मशरूम, फिनाईल, गुळ, लोंच, पापड, मिरची मशाला, रानमेवा, खवय्यांसाठी पुरणपोळी, रुमालरोटी, लाडू आदी साहित्य विक्री व प्रदर्शनीत ठेवण्यात आली आहे. यासह अन्य प्रकारच्या साहित्यांची खरेदी करण्याकरिता नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.