रेती तस्करांनी पोखरले वैनगंगा नदीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 05:00 AM2022-04-06T05:00:00+5:302022-04-06T05:00:34+5:30

लिलाव झाल्या नसल्याने या घाटावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. परंतु, अर्थपूर्ण व्यवहारामुळे कुणीही मोठी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे राजरोस रेतीचा उपसा केला जातो. तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे त्या घाटावरच नियमानुसार उत्खनन होत आहे. परंतु इतर घाटांवर खुलेआम रेती तस्करी केली जात आहे. गत दोन वर्षांपासून रेतीची मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. हा सर्व प्रकार दिवसा ढवळ्या सुरू असते. परंतु महसूल विभागाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करतात.

Wainganga river basin dug by sand smugglers | रेती तस्करांनी पोखरले वैनगंगा नदीपात्र

रेती तस्करांनी पोखरले वैनगंगा नदीपात्र

googlenewsNext

मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लिलाव न झालेल्या घाटावर रेती तस्करांचा डेरा असून, तुमसर तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र रेती तस्करांनी अक्षरक्ष: पोखरून काढले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असून, नदीचा  प्रवाहही थांबला आहे. हा प्रकार खुलेआम सुरू असताना पर्यावरण रक्षणासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही.
राज्याच्या शेवटच्या टोकावरून तुमसर तालुक्यात बपेरा येथून वैनगंगा नदीचा प्रवाह सुरू होता. तालुक्यातील ही मोठी नदी असून, पात्र विस्तीर्ण आहे. उच्च दर्जाच्या पांढऱ्या शुभ्र रेतीसाठी वैनगंगा प्रसिद्ध आहे. अशा या वैनगंगा नदीवरील रेतीघाटांचा दोन वर्षांपासून लिलावच झाला नाही. अहोरात्र तस्कर रेतीचा उपसा करीत आहेत. जेसीबी, पोकलँडच्या मदतीने नदीपात्रात मोठाले खड्डे करून रेतीचा उपसा केला जातो.
लिलाव झाल्या नसल्याने या घाटावर महसूल विभागाचे नियंत्रण आहे. परंतु, अर्थपूर्ण व्यवहारामुळे कुणीही मोठी कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे राजरोस रेतीचा उपसा केला जातो. तालुक्यातील केवळ उमरवाडा घाटाचा लिलाव झाला आहे. त्यामुळे त्या घाटावरच नियमानुसार उत्खनन होत आहे. परंतु इतर घाटांवर खुलेआम रेती तस्करी केली जात आहे. गत दोन वर्षांपासून रेतीची मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. हा सर्व प्रकार दिवसा ढवळ्या सुरू असते. परंतु महसूल विभागाचे अधिकारी थातूरमातूर कारवाई करतात. यामुळे तस्करांचे मनोबल वाढले आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी तस्करांचे मानसे पेरलेली असतात. अधिकाऱ्यांचे वाहन जाताना दिसले की तात्काळ सूचना दिली जाते. त्यामुळे वाहन रस्ता बदलून दुसऱ्या मार्गाने जाते. या सर्व प्रकारात महसूल विभाग आणि पोलीस तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.

वसुंधरा बचाव अभियान कागदावरच
-  शासनाने पर्यावरण रक्षणासाठी वसुंधरा बचाव अभियान सुरू केले आहे. भंडारा येथे सायकल परेडच्या माध्यमातून विक्रम करीत वसुंधरा बचाव अभियान राबविण्यात आले. संपूर्ण प्रशासन या परेडसाठी राबले; परंतु त्याचवेळी जिल्ह्याच्या विविध घाटांतून रेतीचे उत्खनन होत होते. एकीकडे पर्यावरण बचावासाठी अभियान राबवायचे, तर दुसरीकडे रेती तस्करांना खुली सूट द्यायची, असा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे.

संघटित रेती तस्करांकडून चोरी
- तालुक्यात रेती तस्करांच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत.  संघटितपणे रेतीचे राजरोसपणे उत्खनन करतात. खुलेआम मध्य प्रदेश आणि नागपूर येथे नेहमी वाहनातून रेतीची वाहतूक केली जाते. रेती तस्करांना कुणाचेही भय दिसत नाही. महसूल प्रशासन केव्हा तरी थातुरमातुर कारवाई करते; परंतु इकडे कारवाई सुरू असताना दुसरीकडे राजरोस रेतीचा उपसा सुरू असतो.

कोट्यवधींची उलाढाल
- तुमसर तालुक्यातील रेती गुणवत्तापूर्ण आहे. तिला नागपूर व मध्य प्रदेशात मोठी मागणी आहे. या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. आतापर्यंत कायमस्वरूपी तस्करांच्या मुसक्या कुणीही आवळल्या नाहीत. राजकीय प्रवाहाने ही तस्करी सुरू असते. तस्करांचे नेटवर्क एवढे मोठे आहे की, कोणता अधिकारी कुठे जाणार याची माहिती तस्करांना असते.

 

Web Title: Wainganga river basin dug by sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.