वैनगंगा नदीला पूर, भंडारा शहर पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 09:04 AM2020-08-30T09:04:35+5:302020-08-30T09:05:07+5:30
वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी भंडारा शहरात घुसले आहे.
भंडारा : मुसळधार कोसळत असलेल्या पावसानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक गावांत पुराचे पाणी शिरले असून शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली आहे. वैनगंगा नदीच्या पुराचे पाणी भंडारा शहरात घुसले आहे. भंडाऱ्यातील ग्रामसेवक कॉलनी, कस्तुरबा गांधी वार्ड, मेंढा, गुरुनानक वार्ड, सिंधी कॉलनी, टाकळी, भगत सिंग वार्डातील नागरिकांना स्थलांतरित केले आहे. नागरिकांना समाजभवन, शारदा मंदिर, बस स्टँड, वेदांत लॉन, बावणे कुणबी समाज भवन, निशा विद्यालय, गांधी नप विद्यालयात आश्रयाला ठेवले आहे. प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बोटीच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. वैनगंगा नदीचे पाणी भंडारा शहरातील राष्ट्रीय महार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. शिवाजीनगर, नागपूर नाका, शिक्षक कॉलनी, खात रोड वसाहत आदी भागात पुराचे पाणी साचले आहे.