वैनगंगेला पूर, नदीपात्रातील मंदिरात अडकलेल्या पाच भाविकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 05:21 PM2023-07-11T17:21:20+5:302023-07-11T17:22:29+5:30
जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातील बचाव पथकाने तब्बल तीन तास रेस्क्यू राबवून ही मोहीम फत्ते केली
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या अगदी मधोमध पात्रात असलेल्या नृसिंह मंदिरात पुरामुळे अडकलेल्या पाच भाविकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातील बचाव पथकाने तब्बल तीन तास रेस्क्यू राबवून ही मोहीम फत्ते केली.
मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या अगदी मधोमध पात्रात नृसिंह मंदिर आहे. सकाळी या नदीच्या पात्रातील पाणी अचानक वाढायला लागले यामुळे, मंदिरातील पुजारी मनोहर नींबार्ते (६१) आणि भाविक मनोहर खुरगेकर (६१), कल्पना खुरगेकर (४८), गिरीधर वाघाडे (४५), वैशाली चौधरी (३५) हे पाच व्यक्ती मंदिरातच अडकून पडले. मंदिर नदीच्या अगदी पात्रात असले तरी उंचावर असल्याने त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही मात्र पूर वाढल्यावर त्यांना धोका होता. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही बाब जिल्हा नियंत्रण कक्षाला कळविल्यावर तातडीने त्यांच्या बचावासाठी हालचाली करण्यात आल्या. त्यांच्या शोधासाठी आणि बचावासाठी रबरीबोटीसह पथक पाठविण्यात आले.
मंदिरात हे व्यक्ती अडकले असल्याचे लक्षात येताच शोध व बचाव दलाला घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यानंतर रबरी बोटीमध्ये बसवून या सर्वांना सुखरूप पणे काठावर आणण्यात आले. पूर वाढत असल्यामुळे पाण्याला वेग होता. तरीही बचाव दलाच्या पथकाने जोखीम पत्करून त्यांना सुखरूप काठावर आणले. तुमसरच्या उपविभागीय अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे सीताराम कोल्हे,अमरसिंह रंगारी, अशोक देवगडे, कुंभलकर आदींनी ही मोहीम पार पाडली.